रिक्षाचालकांवर कारवाईची जबाबदारी तुमचीसुद्धा; आरटीओच्या भूमिकेवर पोलिस आयुक्त नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 18:19 IST2025-06-14T18:18:32+5:302025-06-14T18:19:13+5:30

संयुक्त कारवाईसाठी पोलिसांचाच पुढाकार

It is your responsibility to take action against rickshaw drivers! Police Commissioner upset with RTO's stance | रिक्षाचालकांवर कारवाईची जबाबदारी तुमचीसुद्धा; आरटीओच्या भूमिकेवर पोलिस आयुक्त नाराज

रिक्षाचालकांवर कारवाईची जबाबदारी तुमचीसुद्धा; आरटीओच्या भूमिकेवर पोलिस आयुक्त नाराज

छत्रपती संभाजीनगर : तीन दिवसांपासून बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईसाठी पोलिस रस्त्यावर उतरलेले असताना आरटीओ विभाग केवळ कारवाईच्या घोषणा करण्यात वेळ घालवत आहे. गुरुवारी पोलिस आयुक्तालयात पार पडलेल्या बैठकीत पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी आरटीओच्या रिक्षाचालकांबाबतच्या या बोटचेप्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. पोलिसांइतकीच रिक्षाचालकांवर कारवाईची जबाबदारी तुमचीदेखील आहे. पोलिसांचे मनुष्यबळ मदतीला देतो, परंतु कठोर कारवाई करा, असे सांगत पवार यांनी संयुक्त कारवाईची सूचना केली.

२ जून रोजीच्या रिक्षाचालकांकडून तरुणाच्या हत्येनंतर प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला. २०२१ ते २०२३ मध्ये तीसपेक्षा अधिक गुन्ह्यांत रिक्षाचालकांचा सहभाग निष्पन्न झाला. रिक्षात बसलेल्या प्रवाशांची लूटमार, महिला, तरुणींसोबत गैरप्रकार, अंमली पदार्थांच्या तस्करीसह लुटमारीच्या सातत्याने शहरात घडत आहेत. रिक्षा व्यवसायात या वाढत्या गुन्हेगारीबाबत ‘लोकमत‘ने वृत्तमालिका प्रकाशित केली. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकांबाबत कारवाईची मोहीमच हाती घेतली. त्यात बुधवारच्या कारवाईत मद्यधुंद अवस्थेतले रिक्षाचालक रंगेहाथ पकडले गेले.

कारवाई करा, आम्ही मदत करतो
‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी गुरुवारी आयुक्तालयात आरटीओ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. यावेळी त्यांनी आरटीओच्या रिक्षाचालकांवरील कारवाईबाबतच्या उदासीनतेवर नाराजी व्यक्त केली. बेशिस्त रिक्षाचालकांची समस्या गंभीर आहे. पोलिसांचे कारवाईचे अधिकार सीमित आहेत. आरटीओने अधिकारांचा वापर करून बेशिस्त, मुजोर रिक्षाचालकांविरोधात कठोर भूमिका घ्यावी. गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या, भरमसाठ दंड प्रलंबित ठेवणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करा, नूतनीकरण करू नका, शक्य असल्यास रिक्षा जप्त करा, अशा सूचना त्यांनी केल्या. पोलिस तुम्हाला मदत करतील, असे आश्वासन पवार यांनी दिले. यावेळी उपायुक्त शीलवंत नांदेडकर, सहायक आयुक्त धनंजय पाटील उपस्थित होते.

गुरुवारी ७ रिक्षा जप्त, ५ मद्यपी चालक ताब्यात
गुरुवारी रात्रीदेखील वाहतूक पोलिसांनी ८१ रिक्षाचालकांची तपासणी केली. त्यात ७ रिक्षा जप्त केल्या. गुरुवारी देखील ५ रिक्षाचालक नशा केलेले आढळल्याचे सहायक आयुक्त धनंजय पाटील यांनी सांगितले.

Web Title: It is your responsibility to take action against rickshaw drivers! Police Commissioner upset with RTO's stance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.