प्रत्येक वसाहतीमधील अनधिकृत बांधकामांना नोटिसा द्या; मनपा प्रशासकांचे अधिकाऱ्यांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 15:25 IST2025-08-29T15:20:03+5:302025-08-29T15:25:02+5:30
शहरात प्लॉट खरेदी करून राजरोसपणे अनधिकृत बांधकाम करण्याचा ट्रेंड मागील काही वर्षांमध्ये तयार झाला.

प्रत्येक वसाहतीमधील अनधिकृत बांधकामांना नोटिसा द्या; मनपा प्रशासकांचे अधिकाऱ्यांना आदेश
छत्रपती संभाजीनगर : शहरात आजही मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे महापालिकेला महसूल मिळत नाही. अनधिकृत बांधकाम करणाऱ्या नागरिकांना नोटिसा द्या, असे आदेश प्रशासक जी. श्रीकांत यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांना दिले.
शहरात प्लॉट खरेदी करून राजरोसपणे अनधिकृत बांधकाम करण्याचा ट्रेंड मागील काही वर्षांमध्ये तयार झाला. महापालिकेच्या नगररचना विभागाकडे वर्षभरात फक्त १५०० ते १७०० फायली बांधकाम परवानगीसाठी येतात. अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना मनपा फक्त दुप्पट मालमत्ता कर लावते. त्यामुळे नागरिक सहसा परवानगी घेण्याच्या प्रक्रियेकडे जातच नाहीत. अनधिकृत बांधकाम करून मालमत्ताधारक महापालिकेच्या सर्व सोयीसुविधांचा लाभ घेतात. त्यामुळे आता बांधकामांवर प्रत्येक झोन कार्यालयांनी लक्ष ठेवण्याचे आदेश गुरुवारी प्रशासकांनी दिले. त्यासोबतच झोन कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या गुंठेवारी वसाहतींमध्ये अनधिकृत बांधकामांचा शोध घेऊन नोटीस बजावणे आणि त्यांना गुंठेवारीनुसार मालमत्ता नियमित करून घेण्यासाठी सूचना करणे, तसेच गुंठेवारी न केल्यास कारवाईचेही देखील आदेश प्रशासकांनी दिले. प्रत्येक वसाहतींमध्ये गुंठेवारीसाठी शिबिर आयोजित करण्याचे आदेश त्यांनी दिले.
बँकांनी कर्ज देऊ नये
गुंठेवारीचे प्रमाणपत्र नसलेल्या मालमत्ताधारकांना कोणत्याही बँकांनी कर्ज देऊ नये, यासाठी शहरातील सर्व बँकांशी पत्रव्यवहार करणार आहे. यात राष्ट्रीयीकृत बँकांसह सहकारी बँकांचा देखील समावेश आहे.