विद्यापीठातील ‘पेट’च्या अंतिम गुणवत्ता यादीत अनियमितता; समितीकडून होणार चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 15:25 IST2025-05-27T15:21:00+5:302025-05-27T15:25:01+5:30
व्यवस्थापन परिषद सदस्याने अंतिम गुणवत्ता यादीत अनियमितेचा केला पुराव्यानिशी भांडाफोड

विद्यापीठातील ‘पेट’च्या अंतिम गुणवत्ता यादीत अनियमितता; समितीकडून होणार चौकशी
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच. डी. प्रवेश परीक्षेनंतर (पेट) अंतिम गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर केली आहे. या गुणवत्ता यादीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा दावा ॲड. दत्ता भांगे यांनी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत पुराव्यानिशी केला. गुणवत्ता डावलून अनेकांना अंतिम यादीत स्थान दिल्याचे सांगितले. त्यावर जोरदार खडाजंगी झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या तक्रारींची आणि अंतिम गुणवत्ता याद्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली आहे.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. २६) पार पडली. या बैठकीत एकूण १९ विषय चर्चेसाठी मांडण्यात आले. त्यातील काही विषय मंजूर केले, तर काही फेटाळण्यात आले. काहींच्या बाबतीत समितीची स्थापना करण्यात आली. पदवीधर गटातील सदस्य ॲड. दत्ता भांगे यांनी ऐनवेळच्या विषयात व्यवस्थापनशास्त्र विषयातील अमीश झळके हा विद्यार्थी गुणवत्ता यादीत वरच्या क्रमांकावर असतानाही त्याच्यापेक्षा कमी गुण मिळालेल्या उमेदवाराची निवड अंतिम यादीत करण्यात आल्याची कागदपत्रेच सादर केली. त्याशिवाय अर्थशास्त्र, समाजशास्त्र या विषयांच्या गुणवत्ता याद्यांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. इतर विषयांत अनेक अनियमितता असल्याचे दाखवून दिले. या प्रकारांमुळे खेड्यातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत पाणी आहे. त्यांच्या मनात अन्याय झाल्यामुळे आत्महत्येसारखे विचार येऊ लागले आहेत. यास दोषी असलेल्या प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी ॲड. भांगे यांनी लावून धरली. त्यास डॉ. योगिता होके पाटील यांनी पाठिंबा देत अनेक विषयांत अनियमितता झाल्याचे सांगितले. त्यावर डॉ. अंकुश कदम, बसवराज मंगरुळे, डॉ. अपर्णा पाटील यांच्यासह इतरांनीही मते मांडली. त्यानंतर चौकशी समिती नेमण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
समितीचा १० दिवसांत अहवाल
व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत माजी प्र-कुलगुरू तथा सदस्य डॉ. श्याम शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली. समितीत डॉ. अंकुश कदम, डॉ. अपर्णा पाटील असणार आहेत. या समितीला दहा दिवसांमध्ये अहवाल द्यावा लागणार आहे. त्याशिवाय पीएच. डी. विद्यार्थ्यांच्या नोंदणीची मुदतही १० दिवसांसाठी वाढविण्यात आली आहे.
मुलाखतींसाठी बाहेरील तज्ज्ञ
पेट परीक्षेनंतर विषय निवडीच्या वेळी घेण्यात येणाऱ्या मुलाखतींसाठी विद्यापीठाच्या कार्यकक्षेबाहेरील प्राध्यापक बोलविण्याचा निर्णयही घेतला. यावेळी ओळखीच्या उमेदवाराला पैकीच्या पैकी मार्क देण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत.