आठ दिवसांपूर्वीच्या खुनाचा तपास करताना झाला नऊ वर्षांपूर्वीच्या खुनाचा उलगडा, दोन्ही खून अनैतिक संबंधातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 13:51 IST2021-05-28T13:43:55+5:302021-05-28T13:51:30+5:30
Crime News in Aurangabad पाचोड हद्दीत १९ मे रोजी कडेठाण येथील अशोक बाबासाहेब जाधव यांचा पत्नीने अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने खून केल्याचे प्रकरण समोर आले.

आठ दिवसांपूर्वीच्या खुनाचा तपास करताना झाला नऊ वर्षांपूर्वीच्या खुनाचा उलगडा, दोन्ही खून अनैतिक संबंधातून
पाचोड : आठ दिवसांपूर्वी अनैतिक संबंधातून झालेल्या खुनाच्या तपासासाठी गेलेल्या पाचोड पोलिसांना नऊ वर्षांपूर्वी झालेल्या आणखी एका खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा झाला आहे. विशेष म्हणजे तो खूनही अनैतिक संबंधातूनच झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी पाचोड पोलिसांचे कौतुक केले आहे.
पाचोड हद्दीत १९ मे रोजी कडेठाण येथील अशोक बाबासाहेब जाधव यांचा पत्नीने अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने खून केल्याचे प्रकरण समोर आले. अशोक जाधव यांची पत्नी रंजना हिने दोन लाख रुपये सुपारी देऊन बहीण मीना पठाडे(करजगाव, ता. औरंगाबाद) हिला अशोक जाधवचा खून करण्यास सांगितले होते. तिने बदनापूर येथील संतोष पवार याला या खुनाची सुपारी दिली. त्याने साथीदारांसह अशोक जाधवचा काटा काढला; मात्र पोलिसांनी तत्काळ या खुनाचे गूढ उकलले व खूनप्रकरणी अशोक जाधव यांची पत्नी रंजना हिला ताब्यात घेतल्यानंतर तिने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. याच खुनाचा तपास करण्यासाठी पाचोड पोलिसांनी रंजनाची बहीण मीना पठाडे हिला ताब्यात घेतले. तिने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसी खाक्या दाखविताच तिने अशोक जाधव यांच्या खुनाची सुपारी संतोष पवारला देऊन त्याच्याकरवी खून करून घेतल्याची कबुली दिली.
यानंतर पोलिसांनी मीना पठाडे हिला तिच्या परिवाराबद्दल सपोनि. सुरवशे यांनी खोदून चौकशी केली. सुरुवातीला तिने टाळाटाळ केली; मात्र नंतर नऊ वर्षांपूर्वी झालेल्या खुनाचा उलगडा झाला. हा खून इतर कोणाचा नाही, तर खुद्द मीना पठाडे हिने स्वत:च्या पतीचा केल्याचे कबूल केले. मीना पठाडे हिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिचे बदनापूर येथील संतोष पवारसोबत अनैतिक संबंध जुळले होते. ही बाब पती मन्साराम पठाडे यांना माहिती पडल्यानंतर ते मीना पठाडेला त्रास देऊ लागले. त्यानंतर तिने संतोष पवारला त्यांचा काटा काढायला सांगितला. त्यानुसार संतोष पवारने १५ फेब्रुवारी रोजी साथीदारांच्या मदतीने मन्साराम पठाडे याचा गळा आवळून खून केला. त्यावेळी या खुनाचा कधीच उलगडा झाला नाही. दोन्ही बहिणींनी केवळ अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने आपल्या पतींना यमसदनी पाठविले. खुनाचा हा गुन्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश सुरवसे, पोउनि. सुतळे, सुरेश माळी, पोहेकाँ आर. बी. आव्हाड, क्षीरसागर, आबासाहेब कणसे, नरेंद्र अंधारे, भगवान धांडे, पवार, पगारे, गोपालघरे, धनवे, राठोड, महिला पोलीस शेख यांनी उघडकीस आणला.
मन्साराम पठाडेचा मृतदेह फेकला चाळीसगावच्या घाटात
करंजगाव येथील मीना पठाडे हिने स्वत:च्या पतीलाही मारल्याचे कबूल केल्यानंतर पोलिसांनी या दोन्ही खुनातील आरोपी संतोष पवार याला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्याने घटनाक्रम विषद केला. तो म्हणाला की, माझे व मीना पठाडे हिचे २००९ सालापासून अनैतिक संबंध होते. यात मन्साराम पठाडे अडसर ठरत असल्याने मीनाने त्याचा काटा काढायचे सांगितले. त्यानुसार आम्ही कट रचला १५ फेब्रुवारी २०१२ रोजी मन्सारामच्या नातेवाइकाचे लग्न कुंभेफळला असल्याने ते लग्नाला गेले होते. तेथून जमिनीचा व्यवहार करायचा म्हणून तेथून मी साथीदारांसह मन्साराम पठाडेला टाटा सुमो गाडीत बसवून नेले. शीतपेयात गुंगीचे औषध टाकून नंतर आम्ही गळा आवळून त्याचा खून केला. हा मृतदेह त्यांनी चाळीसगावच्या म्हसोबा घाटात फेकून दिला.