आरोग्य विभागात ३ लाखांत प्रमोशन अन् बदली प्रकरणात चौकशी सुरू; अहवाल येताच कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 19:26 IST2025-06-17T19:26:09+5:302025-06-17T19:26:39+5:30

याप्रकरणात ‘रडार’वर आलेल्या एका कर्मचाऱ्याने एका पत्राद्वारे आपले म्हणणे आरोग्य उपसंचालकांकडे मांडल्याचे समजते.

Investigation begins in health department's Rs 3 lakh promotion and transfer case; action to be taken as soon as report comes | आरोग्य विभागात ३ लाखांत प्रमोशन अन् बदली प्रकरणात चौकशी सुरू; अहवाल येताच कारवाई

आरोग्य विभागात ३ लाखांत प्रमोशन अन् बदली प्रकरणात चौकशी सुरू; अहवाल येताच कारवाई

छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक आरोग्य विभागात अधिपरिचारिका या संवर्गातून सेवाज्येष्ठतेनुसार परिसेविका या पदावर पदोन्नती तसेच शहराच्या ठिकाणी बदली करून घेण्यासाठी ३ लाख रुपये मोजावे लागत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. याप्रकरणाची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आरोग्य उपसंचालक डाॅ. कांचन वानेरे यांनी सांगितले.

आरोग्य विभाग, छत्रपती संभाजीनगर परिमंडळातील छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील अधिपरिचारिका संवर्गातून सेवाज्येष्ठतेनुसार परिसेविका या पदावर पदोन्नतीची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. ही यादी जाहीर झाल्यानंतर आरोग्य उपसंचालक कार्यालयातील टेबलाखालून कारभार करणाऱ्या काहींनी स्वत:चा ‘उद्योग’ सुरू केला. हा प्रकार ‘लोकमत’ने १६ जून रोजी ‘ पदोन्नती अन् शहरात बदली पाहिजे, मग ३ लाख मोजा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून समोर आणला. याप्रकरणाची गंभीर दखल घेत सोमवारी सकाळीच आरोग्य उपसंचालक कार्यलयात बैठक घेऊन आढावा घेण्यात आला. याप्रकरणी समितीने चौकशी करून अहवाल दिल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

कर्मचाऱ्याने मांडले म्हणणे
याप्रकरणात ‘रडार’वर आलेल्या एका कर्मचाऱ्याने एका पत्राद्वारे आपले म्हणणे आरोग्य उपसंचालकांकडे मांडल्याचे समजते. या प्रकरणात सहभाग नसल्याचे या कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे.

‘पैशांची देवाण-घेवाण होत नाही’
आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर एक फलक आहे. ‘या कार्यालयात कोणत्याही कामासाठी पैशांची देवाण-घेवाण होत नाही. तसे आढळून आल्यास उपसंचालकांशी संपर्क करावा’ असे या फलकावर नमूद आहे.

Web Title: Investigation begins in health department's Rs 3 lakh promotion and transfer case; action to be taken as soon as report comes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.