छत्रपती संभाजीनगर : बिल थकलं, वीज कापली… आणि मग ‘परस्पर’ जोडून पुन्हा उजेड! पण हा जुगाड आता थेट गुन्ह्यात बदलला आहे. वीजबिलाच्या थकबाकीसाठी खंडित केलेला वीजपुरवठा बेकायदेशीररीत्या परस्पर जोडल्याप्रकरणी शहरातील आणखी १४ जणांवर महावितरणतर्फे पोलिसांत वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गत आठवड्यात अशाच कारवाईत ८ ग्राहकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. महावितरणच्या या धडक कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.
चिकलठाणा परिसरातील बकाल गल्लीतील निवृत्ती बंडू बकाल, हनुमान चौकातील कचरू भीषण क्षीरसागर, शेख युसुफ शेख हुसेन, अहमद हुसेन मोहंमद युसुफ, किसन चुन्नीलाल फुलमाळी, महमूद बाबू शेख, चौधरी कॉलनीतील छगन विश्वनाथ गायकवाड, किशोर सूर्यभान चौधरी, योगिता राजू गुंगार्डे, सावित्रीनगरातील सुनीता बाळू गारगोडे, उमेश राय रामेकबल राय, ज्योती दिलीप लोखंडे, गीताबाई रामजी खरात तसेच सिडको एन-२ देवगिरी कॉलनीतील अविनाश दिलीप बनकर या ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीपोटी महावितरणच्या पथकाने काही दिवसांपूर्वी तात्पुरता खंडित केला.
महावितरणचे सहायक अभियंता ज्ञानोबा राठोड व त्यांचे सहकारी तपासणीसाठी गेले असता या ग्राहकांनी त्यांचा वीजपुरवठा अनधिकृतपणे पुनर्जोडणी केल्याचे आढळून आले. हा दखलपात्र गुन्हा आहे. राठोड यांच्या फिर्यादीवरून सिडको पोलिस ठाण्यात १४ आरोपींवर मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.
अनधिकृत वीज देऊ नयेकुणीही बेकायदेशीररीत्या परस्पर वीजपुरवठा जोडू नये. वीज खंडित झालेल्या ग्राहकांना शेजाऱ्यांनीही अनधिकृत वीज देऊ नये. नसता त्यांचीही वीज खंडित करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी दिला आहे.