शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ अन् मंत्री संजय शिरसाट यांच्यात पक्षांतर्गत कलह!
By बापू सोळुंके | Updated: November 25, 2025 18:32 IST2025-11-25T18:32:03+5:302025-11-25T18:32:39+5:30
पक्षाच्या बैठकांपासून आपल्याला दूर ठेवण्याचे षडयंत्र; राजेंद्र जंजाळ यांचा आरोप

शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ अन् मंत्री संजय शिरसाट यांच्यात पक्षांतर्गत कलह!
छत्रपती संभाजीनगर: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यांत पक्षांतर्गत कलह सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.आपल्याला विश्वासात न घेता पालकमंत्री हे बैठका घेत असतात. शिवाय या बैठकांना ते आपल्याला मुद्दामहून डावलत असल्याचा आरोप जंजाळ यांनी केला.
जिल्ह्यात सहा नगर परिषद आणि एक नगरपंचायत निवडणुक सुरू आहे. शिवाय लवकरच जिल्हा परिषद पंचायत समिती आणि मनपा अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहे. यापार्श्वभूमीवर पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरवात झाली आहे. शिंदेसेनेचे शहर जिल्हाप्रमुख म्हणून राजेंद्र जंजाळ कार्यरत आहेत. शिवसेनेत उभी फुट झाल्यापासून ते शिंदेसेनेत आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून जंजाळ आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यात पक्षांतर्गत वाद सुरू असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाप्रमुख म्हणून आपल्याला विश्वासात न घेता पालकमंत्री परस्पर पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतात. तसेच या बैठकांची माहितीही आपल्याला कळविण्यात येत नाही. अशा प्रकारे चार ते पाच बैठका पालकमंत्र्यांनी घेतल्या असल्याचे जंजाळ यांनी लोकमत प्रतिनिधीला सांगितले. आपल्यावर विश्वास ठेवून पक्षाच्या स्थापनेपासून पक्षासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनाही दाबण्याचे काम केले जात आहे. निवडून येण्याची हमी नसल्याने काही महिन्यापूर्वी शिंदेसेनेत आलेल्या लोकांना बैठकांना बोलावल्या जात असल्याचा आरोप जंजाळ यांनी केला. जंजाळ हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यांनी मात्र यास नकार दिला.
कोणत्याही पक्षात जाणार नाही
पालकमंत्री पक्षांतर्गत बैठकांपासून आपल्याला दूर ठेवत असतात. गेल्या काही महिन्यात त्यांनी आपल्या परस्पर चार ते पाच बैठका घेतल्या. आताही महापालिकेचे संभाव्य उमेदवार कोण असतील हे ठरविण्यासाठी आयोजित बैठकीला आपल्याला बोलावण्यात आले नाही. आपण कोणत्याही पक्षात जाणार नाही.
-राजेंद्र जंजाळ, जिल्हाप्रमुख शिंदेसेना.