औरंगाबाद : बारापुल्ला गेट पुलासमोरील रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याच्या आरोपावरून एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांने बांधकाम विभागाचे उपअभियंता अशोक येरेकर यांना शिवीगाळ केली. जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासमोर बुधवारी हा प्रकार घडला. याप्रकरणी एका गटाने पोलिसांत तक्रार केली. बांधकाम विभागाने तक्रार केलेली नाही.
बारापुल्ला गेट पूल आणि समोरील रस्त्याचे काम सुरू असून, त्या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी उपअभियंता येरेकर यांना काम खराब होत असल्यावरून विचारपूस करीत शिवीगाळ केली. खासदार जलील त्या रस्त्याने जात होते, त्यांनी हा प्रकार पाहून वाहन थांबविले. त्या कार्यकर्त्यांना जलील यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते तेथून निघून गेले. या घटनेप्रकरणी उपअभियंता येरेकर यांना विचारले असता ते म्हणाले, यापूर्वीदेखील त्या रस्त्याचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. आजही त्या रस्त्याचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न झाला. ते काम सध्या सुरळीत सुरू करण्यात आले आहे. आरोप आणि उर्मट भाषा वापरणारे कार्यकर्ते कोण आहेत, याबाबत काही माहिती नाही. परंतु त्यांना गुणवत्ता व नियंत्रण विभागाकडे तक्रार करण्यास सांगितले तसेच त्या कामाबाबत काही तक्रार असेल तर तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यास सांगितले. मात्र त्यांची काहीही ऐकण्याची मानसिकता नव्हती. खासदार जलील त्या ठिकाणाहून जात होते, त्यांनीदेखील समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. अद्याप पोलिसांत तक्रार दिली नसल्याचे येरेकर यांनी सांगितले.