डोळ्यांत खाकीचे स्वप्न, भरतीत शेतकरी पुत्र सॅण्डलवरच धावला; जिद्द पाहून एसपींची जागेवरच मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 14:42 IST2026-04-10T14:28:14+5:302026-04-10T14:42:50+5:30
काळजाला भिडणारा संघर्ष! पायात सॅण्डल, मनात पोलीस होण्याची जिद्द; धावताना पाय सोलवटले पण तो थांबला नाही, अखेर साहेबांनीच...

डोळ्यांत खाकीचे स्वप्न, भरतीत शेतकरी पुत्र सॅण्डलवरच धावला; जिद्द पाहून एसपींची जागेवरच मदत
छत्रपती संभाजीनगर: येथील एसआरपीएफ मैदानावर सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत माणुसकी आणि जिद्दीची एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील आंधारसांगवी येथील शेतकरी पुत्र नितीन नाथू चावरे हा तरुण चक्क पायात साध्या सॅण्डल घालून ५ किलोमीटरच्या धावण्याच्या चाचणीत उतरला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने बूट विकत घेण्याइतपतही पैसे त्याच्याकडे नव्हते. मात्र, त्याची ही जिद्द पाहून एसआरपीएफचे पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी त्याला तात्काळ मदतीचा हात दिला आहे.
सॅण्डलवर धावला अन् तिसरा क्रमांक पटकावला
नितीन हा केवळ १२ वी उत्तीर्ण असून गेल्या दोन वर्षांपासून पोलीस होण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहे. आई-वडील शेतकरी असल्याने सरावासाठी आवश्यक असणारे महागडे शूज घेणे त्याला शक्य नव्हते. सॅण्डल घालून ५ किलोमीटर धावणे म्हणजे पाय सोलवटणे आणि वेदना सहन करणे होय, मात्र खाकी वर्दीचे स्वप्न उराशी बाळगून त्याने ही धाव पूर्ण केली. विशेष म्हणजे, अशा कठीण परिस्थितीतही त्याने या धावण्याच्या चाचणीत उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले.
एसपी विक्रम साळींनी दाखवली माणुसकी
भरती प्रक्रियेचा आढावा घेत असताना एसपी विक्रम साळी यांची नजर सॅण्डल घालून धावणाऱ्या नितीनवर पडली. त्याला बोलावून विचारपूस केली असता, "साहेब, शूज घ्यायला पैसे नव्हते, पण पोलीस व्हायचंय," हे त्याचे उत्तर ऐकून तिथे उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. स्वतः हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आलेल्या विक्रम साळी यांनी कष्टाची जाणीव ठेवून तात्काळ नितीनला नवीन बूट मिळवून दिले. केवळ बूटच नव्हे, तर भरतीसाठी येणाऱ्या अशा अनेक गरजू तरुणांसाठी साळी विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून जेवण आणि नाश्त्याचीही सोय करत आहेत.