खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या कैद्याची खंडपीठात निर्दोष मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 20:27 IST2021-07-29T20:25:41+5:302021-07-29T20:27:16+5:30
खुनाचा हेतू सिद्ध करण्यात सरकार पक्ष असफल राहिला.

खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या कैद्याची खंडपीठात निर्दोष मुक्तता
औरंगाबाद : अहमदनगरच्या सत्र न्यायालयाने खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा रद्द करून मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठाचे न्या. व्ही. के. जाधव आणि न्या. एस.जी. डिघे यांनी रोहन ऊर्फ सनी उदय हजारे याची २८ जुलै रोजील निर्दोष मुक्तता केली.
या खून खटल्यात कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही, परिस्थितीजन्य पुराव्यावर खटला आधारित आहे. खुनाचा हेतू सिद्ध करण्यात सरकार पक्ष असफल राहिला. मयतासोबत शेवटच्या वेळेला दिसलेल्या ४ साक्षीदारांची साक्ष, त्यांचा व्यवहार आणि कायद्याच्या निकषावर ग्राह्य धरता येणार नाही. आरोपीचे कपडे घटनेनंतर २५ दिवसांनी जप्त केले होते. त्यामुळे आरोपीनेच गुन्हा केल्याचे सिद्ध करण्यात सरकार पक्ष अपयशी ठरला. आदी मुद्दे ॲड. नसीम शेख यांनी मांडले. सुनावणी अंती खंडपीठाने रोहन ऊर्फ सनी उदय हजारे याची निर्दोष मुक्तता केली.