ट्रक उलटल्यानंतर जखमी चालक रुग्णालयात; इकडे ग्रामस्थांनी सरकीचे पोते नेले चोरून
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 17:08 IST2025-01-09T17:07:31+5:302025-01-09T17:08:25+5:30
छत्रपती संभाजीनगर ते नाशिक महामार्गावरील गारजजवळील खडकी नदीच्या पुलाजवळ ट्रक उलटला; लुटारूंचा पोलिसांकडून शोध सुरू

ट्रक उलटल्यानंतर जखमी चालक रुग्णालयात; इकडे ग्रामस्थांनी सरकीचे पोते नेले चोरून
गारज ( छत्रपती संभाजीनगर) : छत्रपती संभाजीनगर ते नाशिक महामार्गावरील गारजजवळील खडकी नदीच्या पुलाजवळ सरकीने भरलेला ट्रक उलटून चालक गंभीर जखमी झाला. चालकाला रुग्णालयात नेल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी ट्रकमधील अनेक सरकीचे पोते चाेरून नेले. ही घटना मंगळवारी (दि.७) पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार दशरथसिंग भाटी (रा. जोधपूर, राजस्थान) हा चालक सरकीने भरलेला ट्रक (आरजे १९ जीएफ ३५८८) सोमवारी रात्री छत्रपती संभाजीनगर ते नाशिक महामार्गावरून पंजाबकडे जात होता. वैजापूर तालुक्यातील गारजपासून तीन किमी अंतरावरील खडकी नदीच्या पुलाजवळ पहाटे तीन वाजता आल्यानंतर वळणावर ट्रक उलटला. या अपघातात चालक जखमी झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी या ट्रकमधील अनेक सरकीने भरलेले पोते चोरून नेले.
या घटनेची माहिती उशिरा मिळाल्यानंतर बीट जमादार गणेश गोरक्ष व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पलटी उलटलेल्या ट्रकला क्रेनद्वारे रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी शिऊर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिस सरकी लुटणाऱ्यांचा शोध घेत आहेत. या घटनेचा अधिक तपास सपोनी. वैभव रणखांब यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ. गणेश गोरक्ष करीत आहेत.