कुख्यात घरफोड्या कल्ल्या ऊर्फ कलीम खान वळला अवैध दारूविक्रीच्या धंद्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 19:09 IST2019-04-11T19:04:34+5:302019-04-11T19:09:31+5:30

१३ आणि १४ एप्रिल रोजी ड्राय डे असल्याने त्यानिमित्ताने कल्ल्याने घरात दारूचा साठा करून ठेवल्याची माहिती खबऱ्याने दिली. 

The infamous burglary gangster Kaleem Khan turns an illegal liquor supplier | कुख्यात घरफोड्या कल्ल्या ऊर्फ कलीम खान वळला अवैध दारूविक्रीच्या धंद्यात

कुख्यात घरफोड्या कल्ल्या ऊर्फ कलीम खान वळला अवैध दारूविक्रीच्या धंद्यात

ठळक मुद्देराज्य उत्पादन शुल्कचा कल्ल्याच्या घरावर छापा कारवाईत टाकून जप्त केले देशी दारूचे ९ बॉक्स 

औरंगाबाद : गुन्हेगारी सोडल्याचे सांगत, उस्मानपुरा ठाण्यात साफसफाईचे काम करणारा पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात घरफोड्या त्याच्या घरात चोरट्या मार्गाने अवैध दारू विक्री करीत असल्याचे समोर आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या उस्मानपुरा परिसरातील घरावर छापा टाकून देशी दारूचे ९ बॉक्स जप्त केले आणि कल्ल्या ऊर्फ कलीम खान शब्बीर खान पठाण याला अटक केली.

उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक के.पी. जाधव म्हणाले की, उस्मानपुरा परिसरातील कबीरनगर येथे राहाणारा कुख्यात घरफोड्या करणारा गुन्हेगार कलीम खान ऊर्फ कल्ल्या हा त्याच्या घरातून अवैध दारू विक्री करतो. १३ आणि १४ एप्रिल रोजी ड्राय डे असल्याने त्यानिमित्ताने कल्ल्याने घरात दारूचा साठा करून ठेवल्याची माहिती खबऱ्याने दिली. 

यानंतर अधीक्षक प्रदीप वाळुंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक जी.बी. इंगळे, दुय्यम निरीक्षक के.पी. जाधव, दुय्यम निरीक्षक पुष्पा चव्हाण, कॉन्स्टेबल तनवीर शेख, अनंत शेंदरकर, गणेश नागवे पाटील, भास्कर काकड, संजय गायकवाड आणि महिला कॉन्स्टेबल अश्विनी बोंदर यांच्या पथकाने १० एप्रिल रोजी सकाळी कल्ल्याच्या घरावर धाड टाकली. या धाडीत कल्ल्याच्या घरात देशी दारूचे तब्बल ९ बॉक्स चोरट्या मार्गाने विक्री करण्यासाठी आणून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. याप्रकरणी आरोपी कल्ल्या ऊर्फ कलीम खानविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कल्ल्याला सुधारण्यासाठी प्रयत्न
कल्ल्या ऊर्फ कलीम खान हा सतत गंभीर गुन्हे करून नागरिकांना त्रास द्यायचा, तो पोलिसांनाही जुमानत नसे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे कल्ल्याला अनेक वर्षे कारागृहात राहावे लागले होते. गतवर्षी कारागृहातून बाहेर आल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक कल्याण शेळके यांनी वरिष्ठांच्या परवानगीने उस्मानपुरा ठाण्याच्या साफसफाईचे काम कल्ल्याला दिले. आठ महिन्यांपासून कल्ल्या दिवसभर ठाण्यात काम करतो; मात्र तो छुप्या मार्गाने देशी दारू विक्री करीत असल्याचे उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना समजताच त्याच्यावर कारवाई झाली. 

Web Title: The infamous burglary gangster Kaleem Khan turns an illegal liquor supplier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.