इंडिगोच्या पुणे-रायपूर विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड, छत्रपती संभाजीनगरात इमर्जन्सी ‘लँडिंग’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 19:32 IST2025-03-12T19:31:48+5:302025-03-12T19:32:39+5:30
या इमर्जन्सी लँडिंगमुळे प्रवासी भयभीत झाले. परंतु, सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.

इंडिगोच्या पुणे-रायपूर विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड, छत्रपती संभाजीनगरात इमर्जन्सी ‘लँडिंग’
छत्रपती संभाजीनगर : इंडिगोचे पुणे-रायपूर हे विमान इंजिनमधील बिघाडामुळे मंगळवारी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. या इमर्जन्सी लँडिंगमुळे प्रवासी भयभीत झाले. परंतु, सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. दीड तास नादुरुस्त विमानात बसून राहिलेल्या १६१ प्रवाशांना अखेर मुंबई-छत्रपती संभाजीनगर विमानाने रायपूरला पाठविण्यात आले.
पुण्याहून रायपूरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाने नियोजित वेळेनुसार उड्डाण केले. मात्र, उड्डाणानंतर काही अंतरावरच विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकांनी तातडीने नजीकच्या विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घेतला. हे विमान छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणा विमानतळाकडे वळविण्यात आले. चिकलठाणा विमानतळावर सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास हे विमान सुरक्षितरीत्या उतरवण्यात आले. यामुळे विमानातील प्रवाशांचा काही वेळेसाठी काळजाचा ठोका चुकला होता. चिकलठाणा विमानतळावर उतरवल्यानंतर तांत्रिक चमूने बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, यात वेळ लागण्याची शक्यता पाहून प्रवाशांना पर्यायी विमानाची सोय करण्यात आली. मुंबई-छत्रपती संभाजीनगर हे विमान रायपूरला रवाना करण्यात आले, तर छत्रपती संभाजीनगरहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी अन्य विमानाची व्यवस्था करण्यात आली, अशी माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली. यासंदर्भात इंडिगोच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधला, मात्र, प्रतिसाद मिळाला नाही.
नादुरुस्त विमानाचा मुक्काम
रात्री उशिरापर्यंत नादुरुस्त विमान दुरुस्तीचे प्रयत्न सुरू होते. अखेर हे विमान दुरुस्त करून बुधवारी रवाना करण्यात येणार आहे.