औरंगाबादेत स्वतंत्र रेल्वे झोन अशक्य
By Admin | Updated: August 25, 2014 00:25 IST2014-08-25T00:01:49+5:302014-08-25T00:25:34+5:30
औरंगाबाद : औरंगाबादला स्वतंत्र झोन तसेच नांदेड, नागपूर, भुसावळ, पुणे, सोलापूर विभाग एकत्र करून औरंगाबाद हे नवीन झोन तयार करण्याची मागणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी फेटाळून लावली.

औरंगाबादेत स्वतंत्र रेल्वे झोन अशक्य
औरंगाबाद : औरंगाबादला स्वतंत्र झोन तसेच नांदेड, नागपूर, भुसावळ, पुणे, सोलापूर विभाग एकत्र करून औरंगाबाद हे नवीन झोन तयार करण्याची मागणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी रविवारी फेटाळून लावली. फक्त नावालाच झोन बनत असल्याचे ते म्हणाले.
सुभेदारी विश्रामगृहात सिन्हा यांनी भाजपा, रेल्वे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मराठवाडा रेल्वे विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा, मराठवाडा रेल्वे प्रवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. महत्त्वाच्या एकाच रेल्वेची मागणी करावी, या सिन्हा यांच्या सूचनेनंतर औरंगाबाद - कटरा या रेल्वेच्या मागणीवर एकमत झाले. मनमाड - नांदेडदरम्यान विविध मार्गांवर फेज टू फेज दुहेरी मार्ग बनविण्यात यावे, जालना- नगरसोल- जालना ही गाडी मनमाडपर्यंत करण्यात यावी, यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. रेल्वेचे स्थानिक प्रश्न, मागण्या सोडविण्याबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला पाहिजे. यासंदर्भातील अधिकार त्यांना असल्याचे सिन्हा यांनी स्पष्ट केले.
रेल्वेमार्ग सर्वेक्षण संभ्रमाची माहिती
मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनी माहितीच्या अधिकारात सोलापूर- जालना- अजिंठा- जळगाव रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाच्या कामाची सद्य:स्थिती आणि सोलापूर- तुळजापूर- गेवराई- पैठण- औरंगाबाद- घृष्णेश्वर- अजिंठा- जळगाव या ४५० कि.मी. रेल्वे मार्गाच्या टेबल सर्वेक्षणानंतर पुढे काय करणार, अशी माहिती रेल्वेकडे विचारली होती. यामध्ये हे दोन्ही रेल्वेमार्ग सर्वेक्षणात नसल्याची संभ्रम निर्माण करणारी माहिती मिळाली. २००७ मध्ये सोलापूर- जळगाव मार्गाच्या सर्वेक्षणासाठी जवळपास ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला; परंतु आता सर्वेक्षण केलेच नसल्याचे समोर आले आहे. ही माहितीही ओमप्रकाश वर्मा यांनी मनोज सिन्हा यांना दिली.
धार्मिक स्थळे जोडणार...!
निधीच्या उपलब्धतेनुसार आगामी कालावधीत धार्मिक स्थळांना रेल्वे लाईनने जोडण्यात येईल, नवीन रेल्वे फाटक यापुढे बनणार नाहीत, असेही मनोज सिन्हा म्हणाले.