मुकुंदवाडीत ५०० पोलिसांच्या बंदोबस्तात पालिकेचा २२९ अतिक्रमणांवर बुलडोझर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 15:53 IST2025-06-21T15:53:10+5:302025-06-21T15:53:29+5:30
७ तास सलग चाललेल्या कारवाईत २२९ कच्ची, पक्की अतिक्रमणे भुईसपाट

मुकुंदवाडीत ५०० पोलिसांच्या बंदोबस्तात पालिकेचा २२९ अतिक्रमणांवर बुलडोझर
छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडीत शुक्रवारी दुपारी १२:३० वाजता महापालिका, पोलिसांनी मिळून संयुक्तरीत्या अतिक्रमणांवर कारवाई केली. ७ तास सलग चाललेल्या कारवाईत २२९ कच्ची, पक्की अतिक्रमणे भुईसपाट करण्यात आली. या भागात भूकंपसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.
मुकुंदवाडी स्मशानभूमीच्या बाजूला एका हॉटेलसमोर गुरुवारी रात्री ८:०० वाजता मटण विक्रेत्याच्या दुकानात काम करणाऱ्या मस्तान कुरैशी ऊर्फ नन्ना याने मटण कापणाच्या शस्त्राने तीन जणांवर हल्ला केला. यात नितीन सोनाजी संकपाळ (३५, रा. राजनगर, मुकुंदवाडी) यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. शुक्रवारी सकाळी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आग्रहावरून या भागात अतिक्रमण हटाव मोहीम महापालिकेच्या सहकार्याने सुरू केली. व्यापाऱ्यांना सामानही काढण्याची संधी मिळाली नाही. एकानंतर एक टीन शेडची दुकाने जमीनदोस्त करायला सुरुवात झाली. दुकानांमधील रोख रक्कमही अनेकांना काढता आली नाही. दुकानांच्या बाहेर मालक, कर्मचाऱ्यांना काढण्याचे काम करण्यात येत होते. अवघ्या दीड तासात एसटी वर्कशॉपर्यंतची दुकाने पाडली. त्यानंतर मनपाच्या ताफ्याने मोर्चा मुकुंदवाडी भाजीमंडईपर्यंत नेला. तेथून थेट सोहम माेटर्स कॉर्नरपर्यंतची अतिक्रमणे काढली. यामध्ये दोन मजली, तीन मजली इमारतींचाही समावेश होता. दुपारी ४ वाजेनंतर मनपाने मुकुंदवाडी पोलिस ठाण्यापासून पुढे संजयनगर येथे पाडापाडीला सुरुवात केली. राजेश पवार या तरुणाने पत्नीसह अंगावर रॉकेल ओतून घेतले. त्यामुळे या भागात एकच धावपळ झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. पवार कुटुंबीय आक्रोश करीत होते.
पोलिस आयुक्त, मनपा प्रशासक
पोलिस आयुक्त प्रवीण पवार, मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनीही कारवाईची पाहणी केली. अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. जी. श्रीकांत यांच्या पायाचे प्लास्टर नुकतेच काढले आहे. वॉकरच्या साहाय्याने ते चालत आहेत. मुकुंदवाडीत येऊन त्यांनी कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना काेणाच्या दबावाला बळी न पडता कारवाई करा अशी सूचना केली.
५०० पोलिस, १५० मनपा कर्मचारी
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह ५०० पोलिस मुकुंदवाडी भागात सकाळी तैनात करण्यात आले होते. कारवाई करण्यासाठी मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १५० कर्मचारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्याचा आयुक्ताना फोन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री पोलिस आयुक्त प्रठीण पवार यांच्याशी फोनवरून संवाद साधला व सर्व माहिती जाणून घेतली. खून प्रकरणात हायकोर्टात अपील करण्याची सुचना मुख्यमंत्र्यांनी केली.