मराठवाड्यात ‘अवयवदानाचे काम, सरकारी रुग्णालयांत थोडं थांब’ची अवस्था
By संतोष हिरेमठ | Updated: August 13, 2025 13:15 IST2025-08-13T13:05:58+5:302025-08-13T13:15:01+5:30
जागतिक अवयवदान दिन विशेष : मराठवाड्यातील सरकारी रुग्णालयांत अवयव प्रत्यारोपण कधी?

मराठवाड्यात ‘अवयवदानाचे काम, सरकारी रुग्णालयांत थोडं थांब’ची अवस्था
छत्रपती संभाजीनगर : एका ब्रेनडेड रुग्णाच्या अवयवदानाने ८ जणांना नवीन आयुष्य मिळते. अवयवदानाविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि सरकारी रुग्णालये आघाडीवर आहेत. मात्र, प्रत्यक्षात अवयवदानानंतर होणाऱ्या अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया मराठवाड्यातील सरकारी रुग्णालयांत होतच नाहीत. सरकारी रुग्णालयांत अवयव प्रत्यारोपण होणार कधी, असा सवाल गोरगरीब रुग्ण विचारत आहेत.
दरवर्षी १३ ऑगस्ट रोजी जागतिक अवयवदान दिन असतो. यानिमित्त सरकारकडून अवयवदान जनजागृती होतेय. मराठवाड्यात ६ नॉन-ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रॅव्हल सेंटर (एनटीओआरसी) आहेत. हे सेंटर केवळ ब्रेनडेड रुग्णांचे अवयव काढून प्रत्यारोपण होणाऱ्या रुग्णालयात पाठवू शकतात. यात मराठवाड्यातील ५ सरकारी रुग्णालयांचा समावेश आहे. घाटी रुग्णालयात फेब्रुवारी २०१६ आणि फेब्रुवारी २०१७ मध्ये घाटीत अवयवदान झाले; परंतु त्यानंतर झालेच नाही. दुसरीकडे मराठवाड्यातील १३ खासगी रुग्णालयांच्या भरवशावरच अवयवदान सुरू असून, सरकारी रुग्णालयांत मात्र प्रतीक्षाच आहे.
खासगी रुग्णालयांत अवयव प्रत्यारोपणाचा खर्च
- किडनी प्रत्यारोपण : ४.५ लाख ते ७ लाख रु.
- लिव्हर प्रत्यारोपण : २० ते २५ लाख रु.
- हृदय प्रत्यारोपण : २० ते ३५ लाख रु.
- कॉर्निया प्रत्यारोपण : ५० हजार ते १ लाख रु.
मराठवाड्यातील स्थिती
- मराठवाड्यात अवयव प्रत्यारोपण करणारी सर्व १३ रुग्णालये ही खासगी रुग्णालये
- अवयव काढून प्रत्यारोपणासाठी पाठविणारे सेंटर असलेली ५ सरकारी रुग्णालये.
- ९ वर्षांत ४२ ब्रेनडेड व्यक्तींचे अवयवदान
मराठवाड्यात झालेले अवयवदान
- हृदय-१५
- लिव्हर-३५
- किडनी-७९
- फुप्फुस-२
- नेत्र-४६
प्रत्यारोपणासाठी प्रयत्नशील
लोकांनी अवयवदानासाठी पुढे आले पाहिजे. घाटीत किडनी प्रत्यारोपणाच्या दृष्टीने डाॅक्टर्स आणि पायाभूत सुविधा आहेत. तंत्रज्ञांसह अन्य काही सुविधांची प्रतीक्षा आहे. यासाठी प्रयत्न सुरू असून, लवकरच किडनी प्रत्यारोपण सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
- डाॅ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, घाटी
गरजूंची संख्या अधिक
एका व्यक्तीच्या अवयवदानाने आठ जणांचे जीव वाचवू शकतात. दुर्दैवाने दात्यांच्या संख्येपेक्षा अवयवांची गरज असलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. अवयवदान कायदेशीर, नैतिक आणि सर्व प्रमुख धर्मांनी समर्थित आहे.
- सय्यद फरहान हाशमी, मुख्य प्रत्यारोपण समन्वयक, झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर
‘एनटीओआरसी’साठी अर्ज
‘एनटीओआरसी’साठी अर्ज करण्यात येत आहेत. परवानगी मिळताच आपल्याकडेही ब्रेनडेड रुग्णाचे अवयव काढण्याची प्रक्रिया शक्य होईल. अवयवदानासाठी नागरिकांनी पुढे यावे.
- डाॅ. कमलाकर मुदखेडकर, जिल्हा शल्यचिकित्सक