अर्ध्या तासात तोतया पोलिसांनी दोन वृध्दांना घाबरवून चार तोळ्यांचे सोने लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 17:45 IST2025-12-11T17:40:31+5:302025-12-11T17:45:01+5:30
सातारा व जवाहरनगर पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

अर्ध्या तासात तोतया पोलिसांनी दोन वृध्दांना घाबरवून चार तोळ्यांचे सोने लुटले
छत्रपती संभाजीनगर : तपासाचा बनाव करत दोन तोतया पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात दोन वृध्दांना घाबरवून चार तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. ९ डिसेंबर रोजी दुपारी ११:३० ते १२ वाजेदरम्यान शास्त्रीनगर ते संग्रामनगर उड्डाणपुलादरम्यान या घटना घडल्या.
निवृत्त शिक्षक श्रीकांत देशपांडे हे दि. ९ रोजी संग्रामनगर उड्डाणपुलाजवळून पायी जात होते. यावेळी त्यांना अडवून दोघांनी पोलिस असल्याचे सांगितले. गुन्हे घडत असल्याचे कारण सांगून देशपांडे यांना त्यांचे दागिने काढून ठेवण्यास सांगितले. दरम्यान दोघांनी हातचलाखीने त्यांची सोन्याची १ तोळ्याची अंगठी व २ तोळ्यांची सोनसाखळी हिसकावून पोबारा केला. त्यापूर्वी सकाळी ११.३० वाजता ५२ वर्षीय गोपाल कुलकर्णी (एन-६) हे उल्कानगरीतून मोपेडवरून घरी जात होते.
यावेळी शास्त्रीनगरमध्ये दोन अज्ञातांनी त्यांना अडवले. 'आम्ही पोलिस आहोत, तुम्ही सोन्याचे दागिने का घालून फिरताय, शहरात खून होत आहेत', असे म्हणत दागिने काढून बॅगमध्ये ठेवण्यास सांगितले. कुलकर्णी यांनी ६ ग्रॅमची सोन्याची व ७ ग्रॅमची चांदीची अंगठी काढून पिशवीत ठेवत असतानाच पंचनामा करण्याचे कारण करत हातचालाखीने दागिने हिसकावत पोबारा केला. सातारा व जवाहरनगर पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.