दिवसा नशा, रात्री लुटमार; छत्रपती संभाजीनगरातील पूर्वी शांत, कामगार वस्त्या आता गुंडांचा परिसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 12:49 IST2025-03-28T12:49:11+5:302025-03-28T12:49:53+5:30

लोकमत इम्पॅक्ट : शस्त्रांच्या साठा प्रकरणात टोळीवर अखेर गुन्हे दाखल, विशीतील तरुणांचे सोशल मीडियावर नशेखोरी, शस्त्रांचे ‘उदात्तीकरण’

In Chhatrapati Sambhajinagar Drunkenness during the day, robbery at night; Youth in their twenties drugging on social media, 'glorifying' weapons | दिवसा नशा, रात्री लुटमार; छत्रपती संभाजीनगरातील पूर्वी शांत, कामगार वस्त्या आता गुंडांचा परिसर

दिवसा नशा, रात्री लुटमार; छत्रपती संभाजीनगरातील पूर्वी शांत, कामगार वस्त्या आता गुंडांचा परिसर

छत्रपती संभाजीनगर : दिवसभर नशेखोरी तर रात्री राजरोस उघडपणे चालणारी दारू विक्री, लुटमार, अवैध व्यवसायांनी मुकुंदवाडी, रामनगर, नारेगाव, पुंडलिकनगर, पडेगावसारख्या शांत, कामगार वस्त्यांची प्रतिमा मलिन झाली. भाईगिरीच्या नादात विशीतले तरुण गुंडगिरीकडे वळाले. पोलिसांनी याकडे साफ दुर्लक्ष केल्याने या परिसरासह शहरातील गुंड व अवैध व्यावसायिकांधील वाद टोकाला पोहोचल्याचे वारंवार घडणाऱ्या गुन्ह्यांवरून दिसत आहे.

रविवारी रात्री अवैध व्यावसायिक व गुन्हेगारांच्या हप्तेखोरी, खंडणीच्या कारणावरून मुकुंदवाडीत मोठा तणाव निर्माण झाला. घटनास्थळापासून जवळच्या पोलिस कॉलनीत अनेक अंमलदार, अधिकारी वास्तव्यास आहेत. त्यांच्यातही या गुन्हेगारांची दहशत निर्माण झाल्याचे स्वतः पोलिसांनी मान्य केले. एकीकडे शहरात सातत्याने तणावपूर्ण परिस्थिती असताना दुसरीकडे कुख्यात, तडीपार गुन्हेगार शहरात फिरतात. शस्त्र, अमली पदार्थांचे सेवनाचे व्हिडीओ, छायाचित्र सोशल मीडियावर राजरोस पोस्ट करत असल्याने पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

असे चालते रॅकेट : कारागृहातले गुन्हेगार आदर्श
२ फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखेने कुख्यात गुन्हेगार पवन दिवेकरला अटक केली. मुकुंदवाडीतील गुन्हेगार जालनास्थित गुंडांच्या टोळ्या, पवन, पुंडलिकनगरच्या कश्यपला गँगला आदर्श मानतात. पवनवर हत्या, लुटमारीसारखे गंभीर गुन्हे आहेत. त्याचेही सोशल मीडियावर हातकडीतले, न्यायालयातले व्हिडीओ पोस्ट असतात. पोलिस त्याकडे दुर्लक्ष करतात. या टोळ्यांनीच शहरात विविध ठिकाणी अवैध व्यवसाय, अमली पदार्थांचे अड्डेही सुरू केले.

लोकमत इम्पॅक्ट : शस्त्र साठ्यात गुन्हा, पथके रवाना
-लोकमतने मुकुंदवाडीतील गुन्हेगारीचे विदारक चित्र समोर आणले. वरिष्ठांनी याची गंभीर दखल घेतली. गुन्हेगारांच्या शस्त्रसाठाप्रकरणी मंगळवारी विकी हेल्मेट ऊर्फ गौतम सोनकांबळे व मुकेश महेंद्र साळवेवर कलम आर्म ॲक्ट ३/२५, ४/२५ आर्म ॲक्ट सोबत मुंबई पोलिस अधिनियम अंतर्गत कलम १३५ चा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला.
-आरोपींच्या शोधासाठी २ अधिकारी, ८ अंमलदारांचे दोन पथके रवाना झाली. विकीचा साथीदार उमेशला अटक केली. न्यायालयाने त्याला २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

पूर्वी शांत, कामगार वस्त्या : आता गुंडांचा परिसर
मुकुंदवाडी, रामनगर, जिन्सीचे संजयनगर, पुंडलिकनगर, नारेगाव, रांजणगाव, पडेगाव पूर्वी शांत, कामगार वस्त्या म्हणून ओळखल्या जात. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे हे परिसर कुख्यात गुन्हेगार, अवैध व्यावसायिकांचे अड्डे बनले. २० ते २५ टोळ्या सातत्याने येथे सक्रिय असतात. सायंकाळी ६ वाजेनंतर महिलांना यातील अनेक भागांत एकट्याने फिरणेही अशक्य आहे.

Web Title: In Chhatrapati Sambhajinagar Drunkenness during the day, robbery at night; Youth in their twenties drugging on social media, 'glorifying' weapons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.