छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘MH-20’ बरोबरच ‘MH-57’ सुद्धा; चॉइस नंबरसाठी अर्जही आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 16:40 IST2025-06-11T16:33:35+5:302025-06-11T16:40:01+5:30

वैजापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कामकाज सुरू

In Chhatrapati Sambhajinagar district, along with ‘MH-20’, ‘MH-57’ also; Application for choice number also received | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘MH-20’ बरोबरच ‘MH-57’ सुद्धा; चॉइस नंबरसाठी अर्जही आला

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘MH-20’ बरोबरच ‘MH-57’ सुद्धा; चॉइस नंबरसाठी अर्जही आला

छत्रपती संभाजीनगर : वैजापूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मंगळवारपासून कामकाजाला अखेर सुरुवात करण्यात आली. या ठिकाणी वैजापूरसह गंगापूर तालुक्यातील वाहनांसंबंधी कामकाज चालणार आहे. त्यामुळे या दोन तालुक्यांतील वाहनधारकांच्या वाहनांसंबंधी कामासाठी छत्रपती संभाजीनगरला होणाऱ्या चकरा थांबणार आहेत. या कार्यालयामुळे जिल्ह्यातील वाहनांवर ‘एमएच-२०’ बरोबर आता ‘एमएच-५७’ असा नंबर दिसणार आहे.

वैजापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मंगळवारी आ. रमेश बोरनारे, माजी आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत औपचारिक उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी एका वाहनधारकाने चाॅईस नंबरसाठी ‘डीडी’ जमा केला. लवकरच परिवहन मंत्र्यांच्या हस्ते या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा होणार आहे.

१२ अधिकारी-कर्मचारी
या कार्यालयासाठी १२ अधिकारी-कर्मचारी देण्यात आले आहेत. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, २ मोटार वाहन निरीक्षक, ३ सहायक मोटार वाहन निरीक्षकांचा यात समावेश आहे.

या कार्यालयातून कोणकोणती कामे?
वाहनांचे हस्तांतरण, लायसन्सचे नूतनीकरण, परवाना नूतनीकरण, चाॅईस नंबरसाठी अर्ज प्रक्रिया इ. कामकाज या ठिकाणी सुरू झाले आहे. शिकाऊ परवाना, पर्मनंट लायसन्स, नवीन वाहन नोंदणी, योग्यता प्रमाणपत्राचे कामकाज या ठिकाणी सध्या होणार नाही.

‘लोकमत’ने वेधले होते लक्ष
राज्यात लातूर, जळगाव या ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यात येत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये या कार्यालयाची प्रतीक्षाच करावी लागत होती. ‘लोकमत’ने ‘पीपल्स मॅनिफेस्टो’च्या माध्यमातून जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय का नाही, याकडे लक्ष वेधले होते. यासंदर्भात २२ एप्रिल २०२४ रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर वैजापूर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यास ऑक्टोबर २०२४ मध्ये शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली. ‘एमएच-५७’ अशी नवीन ओळख वैजापूरची आता राज्यभर असणार आहे.

Web Title: In Chhatrapati Sambhajinagar district, along with ‘MH-20’, ‘MH-57’ also; Application for choice number also received

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.