मंदिराच्या घुमटावर चढून माथेफिरूचा थेट कळस उखडण्याचा प्रयत्न, छ. संभाजीनगरमधील घटना

By साहेबराव हिवराळे | Updated: March 6, 2025 12:34 IST2025-03-06T12:33:05+5:302025-03-06T12:34:13+5:30

वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला!

In Chhatrapati Sambhajinagar Attempt to uproot the Kalasa of the Viththal Rukmini Temple by climbing the dome | मंदिराच्या घुमटावर चढून माथेफिरूचा थेट कळस उखडण्याचा प्रयत्न, छ. संभाजीनगरमधील घटना

मंदिराच्या घुमटावर चढून माथेफिरूचा थेट कळस उखडण्याचा प्रयत्न, छ. संभाजीनगरमधील घटना

- साहेबराव हिवराळे
वाळूज महानगर :
एका माथेफिरू तरुणाने पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिराच्या आवारात अनधिकृतरित्या प्रवेश केला आणि थेट मंदिराच्या घुमटावर चढून कळस उखडून टाकण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार आज, गुरुवारी (दि.६) पहाटे २.३० वाजेच्या सुमारास घडला. मात्र, त्या तरुणाला वाळूज एमआयडीसी पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

रात्रीच्या वेळी अंगावर शर्ट नसलेला, परप्रांतीय तरुण मंदिराच्या कंपाऊंडमध्ये उडी मारून शिरला. हे पाहताच संस्थानच्या वॉचमनने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दगडफेक करत तो तरुण थेट मंदिराच्या घुमटावर चढला आणि साखळीच्या मदतीने कळसाजवळ पोहचला. काही कळायच्या आत कळस हलवत तो तरुण मोठ्याने आरडाओरडा करू लागला, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

संस्थानच्या वॉचमनने तात्काळ संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र पाटील पवार आणि सचिव आप्पासाहेब पाटील झळके यांना घटनेची माहिती दिली. तसेच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे पाटील यांनाही परिस्थितीची कल्पना देण्यात आली. त्यानंतर पोलीस अधिकारी भगतसिंग घुनावत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. योग्य दक्षता आणि नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे त्या युवकास सुखरूप खाली उतरवून ताब्यात घेण्यात आले. या घटनेत नागरिकांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र पाटील पवार, सचिव आप्पासाहेब पाटील झळके, माजी सरपंच शेख अक्तरभाई, ग्रामपंचायत सदस्य शेख जावेदभाई, शेख चांद, रोहीत राऊत, विष्णु राऊत, जगन्नाथ औताडे, दिपक कानडे, सागर कानडे, लखन सलामपुरे, राजु म्हस्के आदींनी सहकार्य केले.

पोलिसांची सतर्कतेमुळे अनर्थ टळला
वाळूज एमआयडीसी पोलिसांनी योग्य वेळी तातडीने कारवाई केल्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मंदिराच्या पवित्रतेला धक्का न लागू देता त्या युवकाला सुरक्षित खाली उतरवून पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतले. या सतर्कतेबद्दल पोलिसांचे आणि स्थानिक नागरिकांचे  भक्त आणि सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.

Web Title: In Chhatrapati Sambhajinagar Attempt to uproot the Kalasa of the Viththal Rukmini Temple by climbing the dome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.