पशुपालकांसाठी महत्वाचे, जनावरांनाही होतो कॅन्सर; लक्षणे ठाऊक आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 16:30 IST2025-02-08T16:28:30+5:302025-02-08T16:30:49+5:30
मानवाप्रमाणे गायी, म्हशी, बैलांनाही कर्करोगाचा सामना करावा लागत असल्याचे पशुशल्यचिकित्सकांच्या निदर्शनास येत आहे.

पशुपालकांसाठी महत्वाचे, जनावरांनाही होतो कॅन्सर; लक्षणे ठाऊक आहेत का?
छत्रपती संभाजीनगर : मानवाप्रमाणे जनावरांनाही कर्करोग होत असल्याचे पशुचिकित्सकांच्या पाहणीत दिसून आले आहे. विशेषत: जनावरांना शिंगाचा आणि डोळ्याचा कर्करोग होत असल्याचे दिसून आले. यामुळे पशुधनमालकांनी जनावरांना कर्करोग होणार नाही, याची काळजी घेण्याचा सल्ला पशुसंवर्धन उपायुक्तांनी दिला आहे.
जनावरांनाही होतो कर्करोग
दिवसेंदिवस कर्करोगाचे रुग्ण वाढतच असल्याने कर्करुग्णालयांची संख्याही वाढत आहे. मानवाप्रमाणे गायी, म्हशी, बैलांनाही कर्करोगाचा सामना करावा लागत असल्याचे पशुशल्यचिकित्सकांच्या निदर्शनास येत आहे. वेळीच उपचार केल्यास हा कर्करोग बरा होऊ शकतो. परंतु पशुंसाठी क्ष-किरणोपचार, किमोथेरपीसारखे उपचार देणारे सुपरस्पेशालिटी पशुचिकित्सालय आपल्याकडे नाही.
दोन प्रमुख प्रकार
गाई, म्हशी, बैलांना डोळे आणि शिंगाचा कर्करोग होण्याचे प्रमाण अधिक आहे. सध्या या प्रकारचाच कॅन्सर जनावरांना होत असल्याचे पशुवैद्यकांच्या निदर्शनास आले.
अशी आहेत लक्षणे
शिंगाच्या कॅन्सरला सुरुवात होताच शिंगे सरळ न वाढता गाेलाकार वाढू लागतात. शिवाय शिंगांना रक्तपुरवठा बंद होतो. परिणामी, शिंगे ठिसूळ आणि निर्जीव होतात. डोळ्याचा कॅन्सर झाल्यास डोळ्यातून पाणी गळते. जनावरे डोळ्यांना खाजवण्यासाठी भिंती, झाडाला डोळा लावतात. डोळे लाल होतात आणि त्यातून रक्त, पू निघण्यास सुरुवात होते.
काय काळजी घ्याल?
पशुधनमालकांनी त्यांच्या जनावरांना कॅन्सर सारख्या घातक आजारापासून संरक्षण मिळवायचे असल्यास जनावरांचे शिंगे घासू नये, शिंगांना वाॅर्निशसारखे रसायन लावू नये. शिंगे गोलाकार वाढू लागताच तत्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. जनावरांच्या डोळ्यातून पाणी गळत असल्यास वेळीच उपचार करावेत. उशीर झाल्यास शस्त्रक्रिया करून डोळा काढावा लागतो, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सहसंचालक डॉ. गणेश देशपांडे यांनी दिली.
बऱ्याचदा गाय, म्हशींना स्तनाचाही कर्करोग होतो. स्तन सुजणे, दूध पातळ येणे, दूध लवकर नासणे अथवा दुधासोबत रक्त, पू येत असल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवावे, शिंगाचा आणि डोळ्याचा कर्करोग उपचाराने बरा होतो. कर्करोगाचे निदान झाल्यास पशुधन विक्री न करता उपचार करावेत.
- डॉ. असरार अहमद, विभागीय रोग अन्वेषण अधिकारी, पशुसंवर्धन विभाग