तोतया आयएएस अधिकारी कल्पनाचा प्रियकर, रॅकेटमधील दोन सहकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 19:43 IST2025-12-13T19:42:49+5:302025-12-13T19:43:57+5:30
संपूर्ण प्रकरण केवळ फसवणुकीच्याच धर्तीवर येऊन ठेपले; देशविरोधी कृत्याचे पुरावे नाहीत

तोतया आयएएस अधिकारी कल्पनाचा प्रियकर, रॅकेटमधील दोन सहकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी
छत्रपती संभाजीनगर : तोतया महिला आयएएस अधिकारी कल्पना भागवत हिचा प्रियकर मोहम्मद अशरफ गिल, केंद्रीय मंत्र्यांचा तोतया ओएसडी डिम्पी देवेंद्रकुमार हरजाई व श्रीगोंद्याचा जमीन खरेदी-विक्री व्यावसायिक दत्तात्रय पांडुरंग शेटे यांची चौकशी पूर्ण झाली आहे. शुक्रवारी न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले.
कल्पनाच्या अटकेची देशभरात चर्चा झाली. अफगाणी प्रियकरासोबत मोबाइलमध्ये आढळलेले सौदी अरेबिया, अफगाणिस्तानसह पाकिस्तानमधील कँटॉन्मेंट बोर्डचे अधिकारी, त्यांच्या पत्नींच्या नावे असलेल्या मोबाइल क्रमांकांमुळे तपास यंत्रणा हादरून गेल्या होत्या. शहर पोलिसांसह केंद्रीय तपास यंत्रणा, एटीएसने जवळपास १० दिवस कसून चौकशी केली. मात्र, त्यात केवळ अधिकारी असल्याचा बनाव करून त्यांनी अनेकांकडून विविध कारणांसाठी पैसे उकळल्याचे समोर आले. यात शेवटपर्यंत देशविघातक कृत्याचे पुरावे मिळाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
असा आहे घटनाक्रम
- २३ नोव्हेंबर रोजी पंचतारांकित हॉटेलमधून कल्पना भागवतला अटक.
- २८ नोव्हेंबर रोजी तिचा प्रियकर अशरफ, केंद्रीय मंत्र्यांचा ओएसडी म्हणून मिरवणारा डिम्पी देवेंद्रकुमार हरजाईला दिल्लीतून अटक.
- २ डिसेंबर रोजी कल्पनाचा सत्कार केलेले, पैसे दिलेले माजी कुलगुरू एस. एन. पठाण यांनी जबाब नोंदवला.
- ३ डिसेंबर रोजी कल्पनाने खासदार नागेश आष्टीकर यांच्याकडून १ लाख ४५ हजार रुपये घेतल्याचे उघड.
- ६ डिसेंबर रोजी कल्पनाची न्यायालयीन कोठडीत रवानगी.
- ६ डिसेंबर रोजी २०२१ मध्ये कल्पनाच्या संपर्कात आलेल्या शेटेला श्रीगोंद्यातून अटक.
- १२ डिसेंबर रोजी उर्वरित तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी.
बँक खाते, कॉल, मेसेजच सबळ पुरावे
कल्पना व इतर टोळ्यांमध्ये झालेले आर्थिक व्यवहार, व्हॉटस्ॲप चॅटिंग यांतून तोतया अधिकाऱ्यांचे रॅकेट चालवत असल्याचे सबळ पुरावे आहेत. पोलिस फॉरेन्सिक विभागाकडून ते अधिकृतरीत्या मिळवण्याच्या तयारीत आहेत. शिवाय, या टोळीने पैसे घेतलेल्यांचे जबाब साक्ष म्हणून दोषारोपपत्रात समाविष्ट करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. लवकरच या प्रकरणात पैसे दिलेल्यांच्या सखोल जबाबासह दोषारोपपत्र सादर केले जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.