मंत्रीमंडळातून तातडीने हकालपट्टी करून धनंजय मुंडेंवर गुन्हा नोंदवा; मनोज जरांगेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 18:14 IST2025-02-04T18:14:17+5:302025-02-04T18:14:58+5:30
कराड हा कायम मुंडेंच्या सोबत फिरणारा आहे. यामुळे सर्व घटनांची माहिती धनंजय मुंडेंना होती. यामुळे मुंडेंवरही खूनाचा गुन्हा नोंदवावा

मंत्रीमंडळातून तातडीने हकालपट्टी करून धनंजय मुंडेंवर गुन्हा नोंदवा; मनोज जरांगेंची मागणी
छत्रपती संभाजीनगर: खंडणी आणि खून करण्यासाठी टोळ्या पाळणाऱ्या मंत्री धनंजय मुंडेंनी शेतकऱ्यांच्या योजनांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पुराव्यानिशी केला. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी मुंडेंची मंत्रीमंडळातून तातडीने हकालपट्टी करावी आणि त्यांच्यावर गुन्हे नोंदवावेत, अशी मागणी मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.
शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या हत्येला ५८ दिवस आज होत आहे. या गुन्ह्यातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही पोलिसांना सापडला नाही. हत्येनंतर संशयित आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीला पुरावे नष्ट करण्यासाठी काही मोकाट सोडले होते.आजही कृष्णा आंधळे सीआयडीला सापडला नाही. कराड हा कायम मुंडेंच्या सोबत फिरणारा आहे. यामुळे सर्व घटनांची माहिती धनंजय मुंडेंना होती. यामुळे मुंडेंवरही खूनाचा गुन्हा नोंदवावा, अशी आपली मागणी असल्याचे जरांगे म्हणाले. या प्रकरणात आरोपींना गाडी पुरवणारा, धनंजय देशमुख यांना धमकी देणाऱ्यांना अद्याप अटक का केली नाही, महादेव गितेला किती दिवस जेलमध्ये डांबणार, त्याला बाहेर का काढलं नाही, असे सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बीड एसपींना केला. खून करणाऱ्यासोबतच कट रचणारा मोठा आरोपी असल्याचा त्यांनी पुनरूच्चार केला.
नॅनो डिएपी आणि नॅनो युरीया तसेच बॅटरीवर चालणारी फवारणी यंत्र खरेदीत कृषीमंत्री असताना धनंजय मुंडेंनी कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला. शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे खाणारा भ्रष्ट मंत्री राज्याच्या मंत्रीमंडळात आहे, हे राज्याचे आणि बीड जिल्ह्याचे दुर्देव असल्याचे जरांगे पाटील यांनी नमूद केले.
...तर अजितदादांना मानणारा तरुण वर्ग दूर जाईल
जनतेचा कैवारी असल्याचा आव आणणाऱ्या मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या विविध योजनांच्या अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांना दिले नसल्याचे शेतकऱ्यांनी आपल्याला येऊन सांगितल्याचे जरांगे यांनी सांगितले. अजीत दादा यांना मानणारा मोठा तरुण वर्ग आहे. गुन्हेगारी टोळ्या पाळणाऱ्या भ्रष्टाचारी धनंजय मुंडेचा राजीनामा न घेतल्यास तुमच्यासोबत असलेला तरुण वर्ग दूर जाईल,असा इशारा जरांगे पाटील यांनी केली.