- यादव तरटे पाटील ( वन्यजीव अभ्यासक, अमरावती , adisha.wildlife@gmail.com)
२९ जुलै हा या वाघाचा वाढदिवस. जागतिक व्याघ्र दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. निसर्गसाखळीतवाघाचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे; पण या वाघासोबतच निसर्गातील प्रत्येक घटक म्हणजे वाघापासून वाळवीपर्यंत प्रत्येक जण तेवढाच महत्त्वाचा आहे. या प्रत्येक प्राण्याचे निसर्गसाखळीतील महत्त्व त्यांच्याच शब्दांत...
मी जंगलाचा राजा !रामराम मंडळी, मी आहे वाघोबा! मी आहे जंगलाचा राजा. मी भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. आज ना माझा वाढदिवस. मी मांजरवर्गीय कुळातील प्राणी आहे. माझ्यामुळेच जंगल टिकून आहे. जंगलामुळे पाणी जमिनीत मुरते. म्हणूनच जमिनीतील पाण्याची पातळी वाढते. जंगलातून नद्या उगम पावतात, नद्यातून पाणी वाहते. जमिनीतले पाणी आणि नदीच्या पाण्यापासून तुम्ही तहान भागवता. इतकंच नाही तर विहीर व नद्यांचे पाणी तुम्ही शेतीला देता. त्याच पाण्याने तुम्ही धान्यही उगवता. पौराणिक मान्यतेनुसार मी देवीचे वाहन आहे. मग मलाही ‘देव’ मानताच ना. दुर्गादेवीचं वाहन मीच आहे.
माझ्यामुळेच भारताची वाघांचा देश म्हणून ओळख आहे. एकोणाविसाव्या शतकाच्या सुरुवातीला जगात एक लाख, तर भारतात चाळीस हजार इतकी आमची संख्या होती. आता जगात फक्त चार हजार अन् भारतात दोन हजार सहाशे शिल्लक राहिले आहेत. गेल्या शतकात माझी संख्या एकूण ९७ टक्के कमी झाली आहे. मी आपल्या परिचयाचा जरी असलो तरी माझ्याबद्दल काही गैरसमज आहेत. माझी कातडी, नखे, दात यासाठी तुम्ही मला मारता. म्हणून आता आमची संख्या कमी झाली आहे. तुम्ही आम्हाला असंच मारत राहणार तर आम्ही संपून जाऊ. मग तुम्ही कुणाला बघणार? आणि हो मग तर जंगलही संपणार! मग तुम्हाला प्राणवायू, पाणी आणि अन्न कुठून मिळणार?
मी मांसाहारी आहे. हत्ती सोडल्यास मी जमिनीवरील कोणत्याही प्राण्याची शिकार करू शकतो. तसे सांबर माझे सर्वाधिक आवडीचे खाद्य आहे. चितळ, भेकर, चौसिंगा, रानगवा हे देखील मला आवडतात. माझे आयुष्यमान सुमारे २० वर्षे असते. माझ्या जगभरात एकूण ९ प्रजाती आहेत. आज जगभर मला वाचवण्याची मोहीम सुरू आहे. आज माझ्या नावाने देशात ५० व्याघ्र प्रकल्प असून, महाराष्ट्रात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. माझे संरक्षण कराल तरच तुम्ही सुखाने नांदू शकाल.
मी बिबळ्या!मी बिबळ्या बोलतोय! मी चपळ शिकारी, मी मांजरवर्गीय कुळातील प्राणी अशी माझी ओळख! माझ्या आकारमानापेक्षा मोठ्या आकारच्या प्राण्यांचीसुद्धा मी सहज शिकार करू शकतो. जगात माझ्या भारतीय बिबट्या, श्रीलंकन, आफ्रिकन, उत्तर चिनी, चिनी भारतीय, जावा, अरबी, अमूर व कॉकेशियाई बिबट्या अशा एकूण ९ प्रजाती आहेत. माझे वजन व रंग हा अनुक्रमे अधिवास व भक्ष्याच्या उपलब्धतेवर व दर्जावर अवलंबून असतो. माझ्या ठिपक्यांमध्येदेखील विविधता असते. अधिक पावसाच्या प्रदेशात माझी त्वचा गडद सोनेरी, तर वाळवंटी भागात माझी त्वचा फिकट असते. अलीकडेच ताडोबाच्या जंगलात म्हणे आमच्याच प्रजातीचा काळा बिबट दिसला. तो काळा बिबळ्या म्हणजे ही आमची वेगळी जात नव्हे. आमच्या शरीरात असलेले कालिकण (मेलॅनीन) त्वचेतील रंगद्रव्य (पिगमेंट) अधिक प्रमाणात तयार झाल्यामुळे तो काळा दिसतोय. मला चितळ, भेकर, नीलगाय इ. खूर असलेले प्राणी अधिक आवडीचे आहेत. प्रसंगी माकड, ससा, पक्षी व उंदीर यावरही मी गुजराण करतो. तसं पाहिलं तर वाघानंतर जंगलाचा राजा मीच....! अलीकडच्या काळात मी आपला जीव मुठीत ठेवून जगतोय. १७ वर्षांत माझ्या संख्येत सुमारे ८२ टक्के इतकी घट झाली आहे. मी मनुष्यालगतच्या अधिवासात राहण्यासाठी अनुकूलन साधलं तरी माझ्याशी संघर्ष वाढत जात आहे. स्वत:चे संरक्षण हा प्रत्येकाचा स्वभाव असतो. त्यामुळेमी स्वरक्षणासाठी हल्ला करतो; पण यात माझाच बळी जातो. भारतात सन २०१८ मध्ये माझे एकूण २६० सोबती मृत पावले. यात ९० शिकारी, २२ बिबळे गावकऱ्यांनी मारले, तर उर्वरित मृत्यूबाबत अजूनही थांगपत्ता लागला नाही.
मी आहे कोळीनमस्कार मित्रांनो, मी आहे कोळी. मला आठ पाय आणि आठ डोळे आहेत. जगात एकूण १११ कुळांपैकी भारतात माझी ६१ प्रकारची कुळे आढळतात. जगातील ४३,२४४ प्रजातींपैकी भारतात १,६९२ माझ्यासारखे कोळी आहेत. मी आणि आमच्या समूहाची जैवविविधता अतिशय समृद्ध आहे. मात्र, जनमाणसात माझ्याबद्दल गैरसमज आहेत. माझ्यावर हवं तेवढं संशोधन अजूनही झालेलं नाही. माझा अन्नसाखळीत खूप महत्त्वाचा वाटा आहे. पक्षी व इतर सजीवांचे मी मुख्य खाद्य आहे. जंगलात, शेतीशिवारात, घरात, घरातील बागेत, वाळवंटी भागात, दलदलीच्या प्रदेशात, उंच पर्वतावर, खाणींमध्ये थोडक्यात मी सर्वत्रच राहतो. भारतातील शेतकऱ्यांचे कोळीसुद्धा मित्रच आहेत. शेतकरी आपल्या शेतात कीटकांना मारण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी करतात. कीटकनाशकामुळे प्रदूषण तर होतेच, शिवाय अनेक पिकाला फायद्याचे असणारे कोळी मरतात. पिकांचे नुकसान आणि प्रदूषण टाळायचे असेल, तर शेतकऱ्यांनी माझे संवर्धन केले पाहिजे. मी डासही खातो.
मी तुमचा मित्र कोल्हामी धूर्त, मी चतुर हीच ना माझी ओळख! पण मित्रांनो मी तर कुणालाही त्रास देत नाही. मग मला असं का म्हणता? मी सस्तनी, मी मांसाहारी, कॅनिडी माझं कुळ, म्हणजेच कुत्र्यांच्या कुळातील मी कोल्हा होय. माझं शास्त्रीय नाव ‘कॅनिस ऑरियस’ आहे. भारतात माझ्या ऑरियस, इंडिकस व नेरिया, अशा तीन प्रजाती आहेत. यातला मी एक भारतीय कोल्हा आहे. मी हिमालयाच्या पायथ्यापासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र वावरतो. मोकळी मैदाने, गवती कुरणे व वाळवंट माझा आवडत अधिवास आहे. दाट व विरळ जंगलातही मी राहतो. मी निशाचर असून, भक्ष्यासाठी रात्रीच बाहेर पडतो. किडे, उंदीर तसेच ससा व इतर लहान सस्तन प्राण्यांवर मी आपली गुजराण करतो. अलीकडे माझीसुद्धा संख्या झपाट्याने कमी झाली आहे. रस्ते अपघातात माझे वाढते मृत्यू, अधिवास अवनती, बदलते ग्रामीण जीवन, जंगलांचा व गवती कुरणांचा निमुळता होत जाणारा आकार माझ्या जीवावर बेतत आहे.
मी मुंगी !दिसायला लहानशी, तुरुतुरु चालणारी मी आहे मुंगी! माझे जीवन सामाजिक असून, निरनिराळ्या जाती अस्तित्वात आहेत. प्रत्येक प्रजाती एक विशिष्ट काम करते. आमच्यात ना, शेती करणाऱ्या, संरक्षण करणाऱ्या सैनिकी, काम करणाऱ्या कामकरी, चोरी करणाऱ्या किंवा भीक मागणाऱ्या मुंग्याही असतात. आमची दुनिया आहेच न्यारी अन् आम्ही लय भारी! जगातील सर्वाधिक संख्येने असणारा प्राणीसुद्धा मीच होय. मी आपल्याला जरी चावत असले तरी केवळ चावा घेणं माझा उद्योग नाही. मी अतिशय शिस्तप्रिय, सतत कामात रमणारी आहे. जगभरात सुमारे १२,५०० पेक्षा अधिक माझ्या ज्ञात प्रजाती आहेत. भारतात जवळपास १००० प्रजाती आढळतात. माकोडा किंवा मुंगळा आकारमानाने मोठा असला तो माझ्याच वर्गातील सजीव आहे. मी अब्जो वर्षांपासून पृथ्वीतलावर जगण्यासाठी यशस्वी ठरलेला कीटक आहे. अंटार्क्टिका खंड सोडल्यास मी सर्वत्र आढळते. आम्ही एकमेकींना स्पर्श करून आणि विशेष प्रकारच्या द्रवाचा स्राव सोडून संभाषण करतो.
होय मीच तो साप!होय मीच तो साप आहे. मला लोक घाबरतात, कारण माझ्याकडे विष आहे; पण निसर्गाने केवळ चावा घेण्यासाठीच माझा जन्म घातला नाही, तर मी अन्नसाखळीमध्ये संतुलन ठेवतो. मी उंदीर व उपद्रवी कीटकांना खातो म्हणूनच नाही का तुम्ही मला शेतकऱ्यांचा मित्र म्हणता! मी मुद्दाम नाही हो चावा घेत कुणालाही. मला डिवचलं किंवा धक्का लागला तरच मी स्वत:च्या सुरक्षेचा विचार करून प्रतिकार करतो. माझ्या जगभर सुमारे २,५०० प्रजाती असून, भारतात ३७८ प्रजाती आहेत. पैकी फक्त ६९ जातींचे साप विषारी आहेत. महाराष्ट्रात आमच्या ७९ प्रजाती असून, पैकी केवळ १२ विषारी आहेत. समुद्रात आढळणारे सर्व साप विषारी, तर गोड्या पाण्यातील सर्व साप बिनविषारी असतात. न्यूझीलंड, आयर्लंड व बर्म्युडा या प्रदेशांत आम्ही आढळत नाहीत. मादागास्करसारख्या बेटावर विषारी साप आढळत नाहीत.
मी अस्वल!पूर्वी माझे खेळ पाहायला लोक जमायचे. मी नाचू लागलो की, दरवेशाला लोक पैसे द्यायचे. चार-आठ आणे आपल्या झोळीत जमा करून दरवेशी मला गावोवाग फिरवायचां; पण माझे खूप हाल व्हायचे! संसदेत म्हणे वन्यजीव संरक्षण कायदा आला. मी दरवेशांच्या तावडीतून सुटलो. तुम्ही मला अस्वल म्हणता, मराठीत मला नडघ, भल्ल, रिस व तिसळ अशा नावे, तर संस्कृतमध्ये ‘ऋक्ष’ म्हणून ओळखले जाते. लॅटिन भाषेत ‘उर्सुस’ हे माझे नाव आहे. माझी लांबी १.४ ते १.८ मीटर, तर उंची ६० ते ९० सें.मी. असते. वजन ९० ते ११५ कि.ग्रॅ. इतके असते. माझे मागचे पाय आखूड असून, बोटांवर पांढऱ्या रंगाच्या नख्या असतात. अंगावर लांब व दाट काळे केस असतात. छातीवर ‘यू’ या इंग्रजी अक्षराच्या आकाराचा पांढरा किंवा तांबूस, तपकिरी पट्टा असतो. मी जंगलात कोठेही राहते. मी निशाचर असून फळे, फुले, कीटक, कधी-कधी कुजके मांस माझे खाद्य होय. जंगलात फिरताना झाडावर तुम्हाला जर का नख्यांचे मोठे ओरखडे दिसले, तर तो माझाच प्रताप असतो. वाळवीची वारुळे माझ्या फार आवडीची आहेत. तुम्ही माझ्या घरात येता, माझी फळे, माझी मोहफुले पळवता आणि मी प्रतिकार केला, तर मला ‘हल्लेखोर अस्वल’ म्हणता.
मी बेडूक मला पाण्यात शोधा, नाही तर जमिनीवर. कधी कधी तर मी चक्क जमिनीच्या आतही असतो. माझी शीतकालीन व उष्णकालीन समाधी सुरू असली म्हणजे मी सहा सहा महिने बाहेर येत नाही. मित्रांनो मी बेडूक! मी उभयचर असून, नैसर्गिक अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. कीटक माझं आवडीचं खाद्य, तर मी सापाचं आणि पक्ष्याचं आवडीचं खाद्य आहे. जिथे राहतो तिथे मी डरावडराव आवाज काढतो. मला कीटक खायला खूप आवडतात. माझा समावेश उभयचर वर्गाच्या अन्युरा गणातील रॅनिडी कुळात होतो. जगात माझ्या ४,८०० जाती असून, भारतामध्ये माझ्या २७६ प्रजाती आढळतात. माझी ‘होप्लोबॅट्रॅकस टायगेरिनस’ ही जात रॅनिडी कुळात समाविष्ट आहे. मात्र, ही जात पूर्वी ‘राना टायग्रिना’ या नावाने ओळखली जात होती. मी अंटार्क्टिका खंड वगळता जगातल्या सर्व परिसंस्थांमध्ये आढळतो. मी फक्त गोड्या पाण्यातच आढळतो बरं का!
होय मीच शेकरू
तुम्ही आपापली मानचिन्हे घोषित केली. सह्याद्री पर्वतरांगांत वसलेल्या भीमाशंकर अभयारण्यातला महाराष्ट्राचा मानबिंदू म्हणजे मीच तो शेकरू होय. मी महाराष्ट्राचा राज्यप्राणी. मी एक खारीची प्रजाती. माझी शेपटी झुपकेदार, तर माझे वजन अंदाजे दोन ते अडीच किलो असते. माझी लांबी अंदाजे तीन फूट असून, माझ्या शरीरावर केस असतात. माझी तपकिरी रंगाची झुपकेदार शेपटी आकर्षक असते. मी सध्या आय.यू.सी.एन.च्या लाल यादीत संकटग्रस्त प्राणी असून, मी फक्त भारतात आढळतो. भारतात आढळणाऱ्या माझ्या एकूण ७ प्रजाती आहेत. मी आहे भीमाशंकरच्या जंगलातील ‘रटुफा इंडिका’. मी दरवर्षी सहा ते आठ घरटे तयार करतो. मात्र, यातील एकाच घरट्यात पिलांना जन्म देतो. माझा अधिवास, मला लागणारे खाद्य पुरविणाऱ्या वनस्पती व इतर जैवविविधता माझ्या दृष्टीने उपयोगाची आहे.
मी वाळवीमी आहे वाळवी. मला उधई किंवा उधळीसुद्धा म्हणतात. मी एक लाकूड कोरून खाणारा कीटक. माझी संस्कृत भाषेत ‘वल्म’, तर इंग्रजीत ‘टर्माईट’ अशी ओळख आहे. जंगलात जितकं वाघाचं महत्त्व आहे ना तितकंच माझंही महत्त्व आहे, म्हणूनच जंगलातल्या अन्नसाखळीबद्दल ‘टायगर’ टू ‘टर्माईट’ असं म्हटलं जातं. मी वसाहत करून लाकडामध्ये राहते. दमट जागा व जुन्या लाकडामध्ये माझं अस्तित्व तुम्हाला हमखास दिसेल. मी खोडाची कोवळी साल कुरतडून खाते.मला उपद्रवी म्हटलं जातं, पण खरं तर मी कुजवून जमिनीत हुमस तयार करते. मी जमिनीत पोषणतत्त्व वाढवते.
मी जंगलाचा सरदार लांडगा!वाघोबा महाराज, बिबट युवराज, तर मला सरदार म्हणता! एका अर्थाने बरोबरच आहे. खरं म्हणजे जिथे घनदाट जंगल तिथे वाघ. तुलनेने कमी घनदाट जंगल तिथे बिबट, तर घनदाट जंगलासह काटेरी झुडपी व गवती कुरणांच्या जंगलात मी लांडगा राहतो. मात्र, आता माझी संख्या झपाट्याने कमी झाली आहे. बिबट्यांनी अनुकूलन क्षमता साधून चक्क उसाच्या मळ्यातही आपले बस्तान मांडले; पण मी मात्र मागे राहिलो. मानवी स्वभाव आणि प्रवृत्तीत कायम जिवंत असणारा मी लांडगा. मात्र, आता मी जंगलातून हद्दपार होतोय. जंगलाचा कमी होणारा आकार, मानवाचा वाढता वावर, अधिवास विखंडन व अवनती यातून माझ्या परिसंस्थेत अनेक प्रतिकूल बदल झाले.
मी राज्यपक्षी : हारावत मी बीजप्रसारक, मी निसर्गाचा सफाई कामगार, मी शेतकऱ्यांचा मित्र आणि मी पर्यावरणातील महत्त्वपूर्ण घटक. मी अन्नसाखळी आणि अन्नजाळ्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. माझ्या भारतात १२८४ प्रजाती, तर जगात सहा हजारांहून अधिक प्रजाती आहेत. त्यातलाच मी एक हारावत होय. मी तसा महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे. मराठीत हरोळी, हिंदीत हरियाल, तर पिवळ्या पायांचे हिरवं कबुतर म्हणून माझी ओळख आहे. माझे शास्त्रीय नाव ‘ट्रेरॉन फोईनोकोप्तेरा’ आहे. मी कबुतरवंशीय पक्षी असून, मला अनेक धोके आहेत. वाढती शिकार आणि वड, पिंपळासारख्या मोठ्या वृक्षांच्या कत्तली माझ्या जिवावर बेतत आहेत. मी आता दुर्मिळ होत आहे. मला ‘पाचूकवडा’ नावानेसुद्धा ओळखले जाते. माझ्या अंगावरील पाचूसारखी हिरवी झाक व पिवळ्या, निळ्या आणि जांभळ्या अशा कितीतरी रंगांच्या छटा आहेत. गर्द हिरव्या झाडांची ठिकाणे, प्रामुख्याने वड, पिंपळ, उंबर, अंजीर जातीची झाडे ही माझी आवडीची जागा आहे. मार्च ते जून या कालावधीत माझा विणीचा हंगाम येतो. या काळात उंच झाडावरच्या काड्यांनी बनलेल्या घरट्यात मी अंडी घालते. मी महाराष्ट्र, गुजरात, बंगाल, राजस्थान, पंजाब, आसामसह सर्वत्र आढळतो. विकास कामांच्या नावाखाली मोठमोठाली वृक्ष तोडल्यामुळे मला धोका उत्पन्न झाला आहे.