"मी यंत्र नाही, तुमचा जुना सखा आहे!"; ८६ वर्षांच्या रेडिओची ही आत्मकथा वाचून डोळे ओलावतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 13:47 IST2026-02-13T13:46:33+5:302026-02-13T13:47:30+5:30
जागतिक रेडिओ दिन : छत्रपती संभाजीनगरच्या संजय पवारांनी पोटच्या मुलासारखा जपला ७०० रेडिओंचा अफाट ताफा.

"मी यंत्र नाही, तुमचा जुना सखा आहे!"; ८६ वर्षांच्या रेडिओची ही आत्मकथा वाचून डोळे ओलावतील
- प्रशांत तेलवाडकर
छत्रपती संभाजीनगर : एका बाजूला हाय स्पीड इंटनेट आणि कानाला बोचणाऱ्या हेडफोन्सचा जमाना असताना, सिडको एन ८ येथील संजय पवार यांच्या घरात मात्र, काळाचे चाक जणू वर्ष १९४० मध्येच थांबले आहे. त्यांच्याकडे तब्बल ७०० रेडिओंचा असा काही ताफा आहे, की जिथे गेल्यानंतर 'अँटेना'च्या लहरींनी संवाद साधणाऱ्या जुन्या आठवणी पुन्हा जिवंत होतात; पण हे केवळ यंत्र नाहीत, तर पवारांनी पोटच्या मुलांसारखे जपलेले जणू काळजाचे तुकडे आहेत.
जागतिक रेडिओ दिनानिमित्त संजय पवार यांच्या संग्रहातील ७०० भावंडांमधील सर्वांत ज्येष्ठ असलेला ‘मर्फी’ रेडिओने जर आपली आत्मकथा सांगणे सुरू केले तर? हा विचारच भारावून टाकणारा आहे.
माझी आत्मकथा : मी आणि माझा ‘पालक’
“नमस्कार! मी एक जुना लाकडी पेटीतील रेडिओ. आज माझे शरीर थोडे थकले असेल, माझे लाकूड थोडे जुने झाले असेल; पण माझ्या काळजाची धडधड आजही १९४० च्या दशकासारखीच ताजी आहे.
माझी निर्मिती झाली तेव्हा मी घराची शान होतो. दिवाणखान्यात एका उंच पायरीवर मला बसवले जायचे. संपूर्ण कुटुंब माझ्याभोवती असायचे. कधी ‘हवामहल’च्या गोष्टी, कधी अमीन सयानींचा जादूई आवाज, रफी, लतादीदींच्या सुरांनी मी आसमंत उजळून टाकायचो; पण काळ बदलला... टेलिव्हिजन आले, मोबाइल आले आणि मला अडगळीच्या खोलीत टाकले; पण तेव्हाच पवार यांचे हात मला लागले. त्यांनी मला केवळ भंगारातून विकत घेतले नाही, तर मला नवीन आयुष्य दिले. आज माझ्यासोबत माझी ७०० भावंडं आहेत. कुणी ब्रिटिशकालीन ‘रेडिओग्राम’ आहे, तर कुणी आकाराने लहान असलेला ‘ट्रान्झिस्टर’. आम्ही इतिहास आहोत. फाळणीच्या बातम्यांपासून ते स्वातंत्र्याच्या जल्लोषापर्यंत आणि युद्धाच्या घोषणांपासून ते क्रिकेटच्या कॉमेंट्रीपर्यंत... सगळे काही आम्ही आमच्या पोटात साठवून ठेवले आहे.
हेच माझे कुटुंब
विवेकानंद महाविद्यालयात कार्यरत असणारे संजय पवार सांगतात, हे रेडिओ म्हणजे माझा श्वास आहेत. लोक जेव्हा संग्रह पाहायला येतात आणि त्यांच्या डोळ्यांत जुन्या आठवणींचे पाणी येते, तेव्हा माझ्या कष्टाचे चीज होते.
आज रेडिओंचे प्रदर्शन
जागतिक रेडिओ दिनानिमित्त सिडको एन ८ येथील वेणूताई चव्हाण कन्या प्रशालेसमोरील ‘अमर हाऊसिंग सोसायटी’त शुक्रवारी दुर्मीळ रेडिओ प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. सकाळी ११ ते रात्री ८ वाजेदरम्यान प्रदर्शन पाहण्यासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे.