'मै हु डॉन'; बंडखोरांना चकवा देणाऱ्या शिवसेना आमदार उदयसिंग राजपूतांनी धरला ठेका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 13:16 IST2022-06-27T13:15:55+5:302022-06-27T13:16:47+5:30
महाराष्ट्रमध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फुट पाडत वेगळा गट स्थापन केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

'मै हु डॉन'; बंडखोरांना चकवा देणाऱ्या शिवसेना आमदार उदयसिंग राजपूतांनी धरला ठेका
औरंगाबाद: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने राज्यात राजकीय उलथापालथ सुरू आहे. ठाकरे समर्थक विरोधात शिंदे समर्थक अशी पक्षांतर्गत लढाई आता रस्त्यावरून न्यायालयात पोहोचली आहे. या सर्व गदारोळात शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समर्थक आमदार उदयसिंग राजपूत यांनी मात्र मै हु डॉन गाण्यावर ठेका धरला आहे. मला ५० कोटींची ऑफर होती, पण मला गद्दार म्हणून जगायचे नाही, अशा भावना व्यक्त करणाऱ्या आ. राजापूत यांचा 'डॉन' अंदाजाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
महाराष्ट्रमध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फुट पाडत वेगळा गट स्थापन केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीसमोर सरकार स्थिर ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. दरम्यान, शिवसेनेच्या बंडखोरांमध्ये बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पाच आमदारांचा समावेश आहे. मात्र, याला अपवाद कन्नडचे आमदार उदय सिंग राजपूत ठरले आहेत. शिवसेनेशी आणि ठाकरे घराण्याशी निष्ठा आहे. मला गद्दार म्हणून जगायचे नाही, अशा भावना व्यक्त करत शिवसेनेतील बंडखोरांना त्यांनी चपराक लगावली आहे. हे आजही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत.
दरम्यान, रविवारी आमदार राजपूत यांनी आपल्या मतदारसंघांमध्ये येऊन नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. आ. राजपूत एका लग्न समारंभातही उपस्थित होते. यावेळी त्यांनी 'मै हु डॉन' या हिंदी चित्रपटाच्या गाण्यावर ठेका धरला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याच्या माध्यमातून आ. राजपूत बंडखोर आणि विरोधकांना एकाप्रकारे संदेश देत असल्याची चर्चा सोशल मिडीयावर सुरु झाली आहे.
मला ५० कोटींची ऑफर- राजपूत
मला कुणकुण लागली होती. मी थेट औरंगाबादकडे निघालो होतो. माझा मोबाइल बंद केला होता. शिंदे गटाकडून काहीही संपर्क झाल्याबाबत मी कुणाचेही नाव घेऊ इच्छित नाही. मला ५० कोटींची ऑफर होती, पण मला गद्दार म्हणून जगायचे नाही. मी जर आमदार झालो नसतो तर या बॅगा देण्याचे आमिष दाखवलेच नसते, असे आ. राजपूत यांनी स्पष्ट केले.