छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 07:49 IST2025-10-29T07:48:00+5:302025-10-29T07:49:16+5:30
गुजरात, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांतील ११६ आरोपींना पोलिसांनी अटक

छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
छत्रपती संभाजीनगर: अमेरिकेतील नागरिकांना कर चुकविल्याची भीती दाखवून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पोलिसांनी पर्दाफाश केला.
सोमवारी मध्यरात्री १:२० मिनिटांनी बनावट कॉल सेंटरवर छापा टाकून गुजरात, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांतील ११६ आरोपींना पोलिसांनी अटक केली.
यात एका अल्पवयीन आरोपीचाही समावेश आहे. त्यांच्याकडील ११९ लॅपटॉप, मोबाइलसह कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती झोन-२चे पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली. मुख्य पाच आरोपींसह तब्बल ११६ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. सर्व आरोपींना रात्री उशिरा जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणी आणखी काही आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे
चार मजली इमारतीत वर्षभरापूर्वी थाटले होते कॉल सेंटर
चिकलठाणा औद्योगिक परिसरातील एका चारमजली इमारतीमध्ये कनेक्ट एंटरप्रायजेस या नावाने हे कॉल सेंटर सुरू होते. मुख्य आरोपी भावेश प्रकाश चौधरी, भाविक शिवदेव पटेल, सतीश शंकर लाडे, वलय पराग व्यास, अब्दुल फारूक मुकदम शाह ऊर्फ फारुकी आणि जॉन या गुजरातमधील आरोपींनी वर्षभरापूर्वी हे आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर सुरू केले होते. येथून अमेरिकेतील नागरिकांशी संपर्क साधला जात असे. अमेरिकेतील नागरिकांना बनावट मेसेज टाकून संपर्क साधण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. संबंधित नागरिकाने संपर्क साधल्यानंतर हे कॉल सेंटरमध्ये 'डायव्हर्ट' करण्यात येत. त्यानंतर त्यांना अॅमेझॉन गिफ्ट कार्ड, अॅपल आयट्युन्स कार्ड, झेले, वेस्टर्न युनियन आदी कार्ड विकत घेण्यास भाग पाडले जात होते. या कार्डातील पैसे हवालाच्या माध्यमातून भारतीय चलनात आणले जात असल्याचे चौकशीत उघडकीस आले.