बनावट गोळ्यांचा कंटेंट समोर आल्यास ‘साइड इफेक्ट’ समजणार; तज्ज्ञांचा दावा
By राम शिनगारे | Updated: December 13, 2024 19:37 IST2024-12-13T19:37:02+5:302024-12-13T19:37:42+5:30
जिवाशी खेळ मालिका: जेनरिक औषधींच्या नावाखाली बनावट प्रकार होऊ लागले

बनावट गोळ्यांचा कंटेंट समोर आल्यास ‘साइड इफेक्ट’ समजणार; तज्ज्ञांचा दावा
छत्रपती संभाजीनगर : रुग्णांना बनावट गोळ्यांचे वाटप करणे हा त्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे. डॉक्टरांनी रुग्णांना त्यांच्या प्रकृतीनुसार उपचारासाठी दिलेली औषधेच बनावट असतील तर त्यांचे ‘साइड इफेक्ट’ रुग्णावर होणार आहेत. हा ‘साइड इफेक्ट’ बनावट गोळ्यांमध्ये कोणता कंटेंट वापरला त्यावरून समजेल, असा दावा औषधनिर्माणशास्त्रातील तज्ज्ञांनी केला. केंद्र शासनाने देशातील रुग्णांना ‘ट्रेड नेम’ऐवजी स्वस्तातील जेनेरिक औषधांचा पुरवठा सुरू केलेला आहे. त्या जेनेरिक औषधांमध्ये उच्च दर्जाचे कंटेंट असतात. मात्र, त्यासाठीच्या परवानग्या अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) घेणे बंधनकारक असते. उघडकीस आलेल्या प्रकारात चक्क बनावट औषधेच वापरली आहेत. हे अतिशय धक्कादायक असून, यंत्रणेला रुग्णांच्या जिवाशी पर्वा नसल्याचेच यातून दिसून येत असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
बीड जिल्ह्यातील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात वर्षभरात चार कंपन्यांनी बनावट गोळ्यांचा पुरवठा केल्याचे उघडकीस आल्यानंतर चौकशीत तब्बल ११ जिल्ह्यांमध्ये बनावट गोळ्यांची पुरवठा केल्याचे स्पष्ट झाले. त्यात छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयातही बनावट गोळ्यांचा पुरवठा झाल्याचे उघडकीस आले. विशेष म्हणजे बनावट गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारास ब्लॅक लिस्ट केलेले असताना त्याने दोन कोटींच्या निविदांमध्ये सहभाग घेतला. त्यामुळे शासकीय रुग्णालये, अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी आणि पुरवठादार यांच्यातील ‘सिंडिकेट’मुळे असे प्रकार घडत असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले. हे लोण खासगी डॉक्टरांकडे पसरलेले असू शकते, अशी शंकाही तज्ज्ञांनी व्यक्त केली.
तज्ज्ञ काय म्हणतात?
औषधींची नियमित तपासणी व्हावी
शासकीयसह खासगी रुग्णालयांमध्ये वापरण्यात येणाऱ्या औषधांची नियमित तपासणी व्हावी. आपल्या देशात औषधे दोन प्रकारांत तयार केली जातात. त्यात ट्रेड नेम आणि जेनेरिक असे प्रकार आहेत. दोन्ही प्रकारांत औषधांची निर्मिती करताना एफडीएकडून वेगवेगळ्या पातळ्यांवर परवानगी घ्यावी लागते. मात्र, बनावटच औषधांचे वाटप झाले असेल तर ते अतिशय धक्कादायक आहे. हा रुग्णांच्या जिवाशी खेळला जाणारा प्रकार आहे.
- डॉ. प्रवीण वक्ते संचालक, सिफार्ट विद्यापीठ
नक्कीच ‘साइड इफेक्ट’ होणार
बनावट गोळ्यांचे वाटप करण्यात आल्याचे उघडकीस येणे अतिशय धोकादायक आहे. बनावट गोळ्यांमध्ये कोणता कंटेट वापरला, हे तपासणे गरजेचे आहे. त्यामध्ये चुकीचा कंटेंट असेल आणि रुग्णांना दुसऱ्याच्या कंटेंटच्या औषधांची शिफारस डॉक्टरांनी केली असेल तर त्याचे साइड इफेक्ट नक्कीच होतात. अधिक तपासणी केल्यास बनावट गोळ्या दिलेल्या रुग्णांवर ‘साइड इफेक्ट’ झालेले असतील.
- डॉ. बापू शिंगटे, संशोधक, रसायनशास्त्र, विद्यापीठ
प्रत्येक टप्प्यावर तपासणी होते
कोणत्याही औषधांची निर्मिती करताना त्याची प्रत्येक टप्प्यावर एफडीएकडून तपासणी केली जाते. औषधे तयार होत असताना एफडीएचे लक्ष असते. मात्र, त्या प्रक्रियेशिवाय औषधे तयार करून त्यांचे वाटप केले असेल तर ते धोकादायक आहे. एवढेच काय, औषधे बनविणाऱ्या कंपनीलाही एफडीएकडूनच मान्यता घ्यावी लागते. औषधांत कोणता कंटेंट वापरला जातो, त्यांचे ‘साइड इफेक्ट‘ काय, याचीही तपासणी एफडीए करीत असते.
- डॉ. जयप्रकाश संगशेट्टी, संशोधक, औषधनिर्माणशास्त्र