'मी नायलॉन मांजा वापरणार नाही'; छत्रपती संभाजीनगर पालिकेच्या १८ हजार विद्यार्थ्यांची शपथ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 15:07 IST2025-12-15T15:06:19+5:302025-12-15T15:07:30+5:30
नायलॉन मांजाच्या वापरामुळे अनेक गंभीर अपघात घडत असल्याचे सातत्याने समोर येत आहे.

'मी नायलॉन मांजा वापरणार नाही'; छत्रपती संभाजीनगर पालिकेच्या १८ हजार विद्यार्थ्यांची शपथ!
छत्रपती संभाजीनगर: नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्रीकांत यांच्या आदेशानुसार मनपाच्या शाळांमधील बालवाडी ते इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या तब्बल १८ हजार विद्यार्थ्यांना नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ देण्यात आली आहे.
नायलॉन मांजाच्या वापरामुळे अनेक गंभीर अपघात घडत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच जनजागृती व्हावी, यासाठी मनपाच्या सर्व शाळांमध्ये आज सकाळी परिपाठाच्या वेळेस नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ देण्यात आली. विद्यार्थ्यांना नायलॉन मांजा स्वतः वापरू नये, तसेच मित्र-मैत्रिणी किंवा शेजारी कोणी वापरत असल्यास त्याची माहिती तात्काळ शिक्षक किंवा पोलिसांना देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाची नायलॉन मांजा विरोधात धडक मोहीम
पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांच्या आदेशाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध ठिकाणी छापे मारून नायलॉन मांजा विकणाऱ्यावर कारवाई करणे सुरू झाले आहे. पोलिसांनी सहा गुन्हे दाखल केले असून २८ हजारापर्यंतचा मुद्देमाल जप्त केला. नायलॉन मांजामुळे अनेकांना इजा होत आहे. नायलॉन व सिंथेटिक मांजा वापरू नये, या वापराने स्वतःचा जीव तर धोक्यात घालतोच परंतू वयोवृद्ध,लहान, दुचाकी स्वार, पशुपक्षी यांच्या जीवितास धोका निर्माण होतो. मांजा विक्री करणारे आणि वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी दिला आहे.