पतीची ‘हेबियस कॉर्पस’ याचिका: बेपत्ता पत्नी कोर्टात हजर, पुन्हा कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 13:12 IST2025-10-14T13:12:08+5:302025-10-14T13:12:43+5:30
पती-पत्नीमधील बेबनाव संपुष्टात, मुलांना मिळाले आईचे छत्र; न्यायालयाने उभयतांसोबत चर्चेद्वारे कक्षात सोडविला कौटुंबिक प्रश्न

पतीची ‘हेबियस कॉर्पस’ याचिका: बेपत्ता पत्नी कोर्टात हजर, पुन्हा कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय
छत्रपती संभाजीनगर : पती-पत्नीमध्ये असलेला बेबनाव न्यायालयाने कक्षात उभयतांशी चर्चेद्वारे सोडविला. परिणामी, कौटुंबिक प्रश्न सुटल्यामुळे विखुरलेले कुटुंब पुन्हा एकत्र आले आणि दोन लहान मुलांना आईचे छत्र मिळाले. ही सुखद घटना नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठात ‘हेबियस कॉर्पस’ याचिकेच्या सुनावणीच्या दरम्यान घडली.
बेपत्ता असलेल्या पत्नीचा शोध घेण्यासंदर्भात ‘मिसिंग’ तक्रारीनुसार संबंधित पोलिस ठाण्याकडून कार्यवाही न झाल्यामुळे पतीने दाखल केलेल्या ‘हेबियस कॉर्पस’ याचिकेच्या अनुषंगाने बेपत्ता पत्नीचा शोध घेऊन पोलिसांनी औरंगाबाद खंडपीठात हजर केले होते.
काय होती याचिका?
याबाबत तक्रारदाराने त्याच्या बेपत्ता पत्नीचा शोध घेण्यासाठी १५ मे रोजी परभणी जिल्ह्यातील सोनपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल करून ३ महिने उलटूनही पोलिसांनी कार्यवाही केली नाही. त्यामुळे पतीने खंडपीठात याचिका दाखल केली होती. खंडपीठाने गृहविभागाच्या प्रधान सचिवांसह परभणीच्या पोलिस अधीक्षकांना नोटीस बजावल्यानंतर ‘मिसिंग’ तक्रारीमधील हरवलेली महिला स्वत:हून दुसऱ्या पुरुषासोबत राहत असल्याचे निवेदन पोलिसांनी खंडपीठात केले होते. मात्र, या महिलेस न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांना हजर केले असता, न्यायालयाने संबंधित महिलेस व तिच्या पतीस त्यांच्या वकिलांसह चर्चेकरिता कक्षात बोलावले. चर्चेअंती संबंधित महिलेला तिची चूक लक्षात आली व तिने दोन मुले, पतीसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. याबाबत तिने ॲड.डी.बी. पवार पाथरेकर यांच्यामार्फत लेखी हमीपत्र खंडपीठात सादर केले.