स्पर्धा परीक्षार्थींवर उपासमारीची छाया; गॅस टंचाईमुळे खानावळीत केवळ 'खिचडी'चा बेत, विद्यार्थी चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 19:25 IST2026-03-14T19:24:49+5:302026-03-14T19:25:15+5:30
मेसचे दर वाढले अन् पोळीही गायब! गॅस टंचाईचा फटका हजारो स्पर्धा परीक्षार्थींना; विद्यार्थ्यांचा दाटून आला कंठ

स्पर्धा परीक्षार्थींवर उपासमारीची छाया; गॅस टंचाईमुळे खानावळीत केवळ 'खिचडी'चा बेत, विद्यार्थी चिंतेत
- प्रशांत तेलवाडकर
छत्रपती संभाजीनगर : “मोठी स्वप्ने घेऊन घरापासून दूर आले. दिवसभर अभ्यास करते; पण आता जेवणाचीच चिंता लागली आहे. खानावळीत तीन दिवसांपासून खिचडीच मिळत आहे. त्यातही त्यांनी मासिक रक्कमही वाढविली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर गावाकडे परतावे लागेल,” असे बोलताना एका स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थिनीचा कंठ दाटून आला. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी शहरात आलेल्या हजारो तरुण-तरुणींच्या मनातील ही वेदना आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये एमपीएससी, बँकिंग, रेल्वे, पोलिस भरती इ. स्पर्धा परीक्षांसाठी मराठवाड्यासह खान्देश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने विद्यार्थी येतात. हॉस्टेल किंवा भाड्याच्या खोल्यांमध्ये राहून ते दिवसरात्र अभ्यास करत असतात. त्यांचे रोजचे जेवण प्रामुख्याने खासगी खानावळींवर अवलंबून असते.
मात्र, गॅसटंचाईमुळे अनेक खानावळींच्या स्वयंपाकघरावर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी जेवणातील पदार्थ कमी झाले असून काही खानावळीत सलग तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांना खिचडीवरच समाधान मानावे लागत आहे. एवढेच नव्हे तर वाढत्या खर्चाचे कारण देत काही खानावळ मालकांनी मासिक शुल्कात वाढ केली आहे.
काही खानावळ मालकांनी गॅसटंचाई कायम राहिली तर २५ तारखेनंतर तुम्हाला जेवणाची वेगळी व्यवस्था करावी अशी सूचना दिल्याने क्रांती चौक, अजबनगर, नूतन कॉलनी, समर्थनगर, औरंगपुरा, स्टेशन रोड, बन्सीलालनगर, एन ६ परिसर, गुलमोहर कॉलनी, बीड बायपास, इ. भागातील विद्यार्थी चिंतित आहेत.
जेवणाची सोय नसेल तर अभ्यासात मन कसे लागणार?
घरच्यांनी मोठ्या अपेक्षेने शहरात पाठवले आहे. स्पर्धा परीक्षा पास होऊन आयुष्य बदलायचे स्वप्न आहे. पण, जेवणाचीच सोय नसेल तर येथे राहून अभ्यास कसा करायचा?”
-श्रृतिका आढाव, अकोला
अनेक जणी गावाकडे परतण्याच्या तयारीत
या संकटामुळे आमच्या मैत्रिणी एप्रिलआधीच गावाकडे परतण्याची तयारी करीत आहेत.
-अक्षरा थोरात, अहिल्यानगर
जेवणाचे २०० रुपयांनी मासिक दर वाढविले
खानावळी चालकांनी मासिक दर वाढविले. १५०० रुपये मागील महिन्यात आम्ही देत होतो. आता १७०० रुपये द्या, असे सांगण्यात आले. मुलांना २००० ऐवजी २२०० रुपये द्यावे लागतील.
-स्नेहल फरकडे, अकोट,
अभ्यासापेक्षा जेवणाचे टेन्शन
काही खानावळीमध्ये खिचडीच देत आहेत. काही खानावळीत पोळी बंद केली तर काही खानावळीत दोन भाज्यांऐवजी एकच भाजी दिली जात आहे. किमतीही वाढविल्या आहेत. यामुळे अभ्यासापेक्षा जेवणाचेच टेंशन आले आहे.
-जान्हवी तोटेवाड, नांदेड