पोलीस भरतीची तयारी करणारे शेकडो उमेदवार रस्त्यावर उतरले; NCC गुणांवर घेतला आक्षेप
By बापू सोळुंके | Updated: October 8, 2022 17:40 IST2022-10-08T17:40:27+5:302022-10-08T17:40:53+5:30
NCC च्या विद्यार्थ्यांना मार्क नको कोटा द्या; पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी निदर्शने करून केली मागणी

पोलीस भरतीची तयारी करणारे शेकडो उमेदवार रस्त्यावर उतरले; NCC गुणांवर घेतला आक्षेप
औरंगाबाद : राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) प्रमाणपत्रधारकांना अ, ब आणि क गटातून अनुक्रमे २, ३ आणि पाच गुण देण्याचा शासन निर्णय मागे घ्यावा, हवे तर त्यांना वेगळा कोटा द्यावा या मागणीसाठी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी शनिवारी सायंकाळी टीव्ही सेंटर मैदानावर जोरदार निदर्शने केली.
आगामी काळात राज्य पोलीस दलात पोलीस शिपाई पदाची सुमारे २० हजार रिक्त पदांची भरती होणार आहे. कोविडमुळे राज्य पोलीस दलातील भरती प्रक्रिया रखडली. आता राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात साडेसात हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला. असे असले तरी अद्याप पोलीस भरतीची जाहिरात नाही. राज्य सरकारने राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) प्रमाणपत्रधारक उमेदवारांना पोलीस भरतीत अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची माहिती मिळताच उमेदवारांमध्ये संताप पसरला. अनेक वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी आम्ही करीत आहोत. पोलीस भरतीची तयारी करणारी बहुतेक मुले सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. अशा वेळी या उमेदवारांपेक्षा कमी गुण असूनही एनसीसी प्रमाणपत्रधारक उमेदवाराची निवड केली जाऊ शकते. यामुळे उमेदवारांवर अन्याय होणार आहे. यामुळे शेकडो तरुण, तरुणी शनिवारी टीव्ही सेंटर मैदानावर एकवटले. छत्रपती फाउंडेशनच्या बॅनरखाली या उमेदवारांनी जोरदार निदर्शने केली.
पोलीस भरतीसंदर्भात एनसीसी प्रमाणपत्रधारक उमेदवारांना अतिरिक्त गुण देण्याचा शासन निर्णय रद्द करावा, अशी मागणी केली. हवे तर त्यांना वेगळा कोटा द्यावा असेही आंदोलक म्हणाले. आंदोलनाचे नेतृत्व सचिन तायडे, किरण अंभोरे, यादवराव मारकड आदींनी केले. आंदोलनास गालबोट लागू नये, यासाठी पोलीस निरीक्षक संभाजी पवार, उपनिरीक्षक कैलास अन्नलदास आणि कर्मचारी उपस्थित होते.