"लेक गेली पण 'ज्ञान' बनून उरली!" अवघ्या दोन महिन्यांच्या बालिकेचे घोरपडे कुटुंबाने केलं देहदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 19:18 IST2026-02-13T19:17:33+5:302026-02-13T19:18:01+5:30

५४ दिवसांच्या चिमुकलीचे घाटीत देहदान; राजूर येथील घोरपडे दाम्पत्याचा ऐतिहासिक निर्णय

Humanity Beyond Grief: Parents of 54-Day-Old Baby Donate Her Body to Ghati Medical College in Chhatrapati Sambhajinagar | "लेक गेली पण 'ज्ञान' बनून उरली!" अवघ्या दोन महिन्यांच्या बालिकेचे घोरपडे कुटुंबाने केलं देहदान

"लेक गेली पण 'ज्ञान' बनून उरली!" अवघ्या दोन महिन्यांच्या बालिकेचे घोरपडे कुटुंबाने केलं देहदान

छत्रपती संभाजीनगर : कधी कधी आयुष्य एका क्षणात सगळं बदलून टाकतं. घरात नुकतेच आलेल्या पहिल्या बाळाचं रडणं, आईच्या कुशीतला उबदार श्वास… तो आनंद... पण अवघ्या काही दिवसांतच त्या श्वासाचं थांबणं ! ५४ दिवसांची लेक कायमची हरवली, तेव्हा आई - वडिलांच्या जगण्याचा आधारच जणू कोसळला. अशा वेळी माणूस तुटतो, हतबल होतो… पण राजूर येथील प्रज्ञा घोरपडे आणि पंडित घोरपडे या माता-पित्याने दुःखातही आपल्या चिमुकल्या मुलीचे घाटीत देहदान करून तिच्या जाण्याला अर्थ दिला. त्यांच्या या निर्णयामुळे देहदानाबाबत समाजात नवी जाणीव निर्माण होईल, वैद्यकीय शिक्षणाला मदत होईल आणि एका चिमुकल्या जिवाची आठवण ‘ज्ञान’ बनून कायम राहील.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे ही हृदयस्पर्शी घटना घडली. घोरपडे दाम्पत्याच्या दोन महिन्यांच्या मुलीची प्रकृती अचानक बिघडल्याने तिला घाटीत दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण, नियतीने काही वेगळेच ठरविले. ११ फेब्रुवारी रोजी ‘मेंनिंजायटिस’मुळे तिचा मृत्यू झाला. मेंनिंजायटिस म्हणजे मेंदू आणि पाठीच्या कण्याभोवती असलेल्या आवरणाला होणारी सुज व संसर्ग. हा आजार घातक ठरू शकतो.

लेक गेल्यावर घरात केवळ शांतता उरली… अशा वेळी कुटुंब अंत्यविधीची तयारी करते. पण, घोरपडे कुटुंबीयांनी वेगळाच विचार केला. त्यांनी मुलीचा अंत्यविधी करण्याऐवजी तिचे देहदान करण्याचा निर्णय घेतला. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. अर्चना कल्याणकर, डॉ. स्वप्ना अंबेकर आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने आवश्यक प्रक्रिया पार पाडत पार्थिव स्वीकारले. पुढील वैद्यकीय शिक्षण आणि अभ्यासासाठी या देहदानाचा उपयोग होईल.

अर्भकाच्या देहदानाची होती माहिती
यापूर्वी घाटीतील शरीररचनाशास्त्र विभागात २३ आठवड्यांच्या अर्भकाचे देहदान झाले आहे. याविषयी ‘लोकमत’ने २९ डिसेंबर २०२५ रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या बालिकेच्या पालकांना या देहदानाची माहिती होती. त्याच प्रेरणेतून त्यांनी चिमुकलीचे देहदान करण्याचा निर्णय घेतला. घाटीच्या शरीररचनाशास्त्र विभागासाठी जन्मानंतर इतक्या अल्पवयीन बालकाचे देहदान मिळण्याचा हा दुर्मीळ प्रसंग ठरला आहे.

Web Title : शिशु का शरीर दान; घोड़पड़े परिवार ने दुख को ज्ञान में बदला।

Web Summary : अपने दो महीने की बेटी की मौत से टूटे घोड़पड़े परिवार ने औरंगाबाद के एक मेडिकल कॉलेज में उसका शरीर दान कर दिया। यह निस्वार्थ कार्य चिकित्सा शिक्षा के लिए अनमोल संसाधन प्रदान करता है, और ज्ञान की स्थायी विरासत छोड़ता है।

Web Title : Infant's body donated; Ghodpades turn grief into medical knowledge.

Web Summary : Shattered by their two-month-old daughter's death, the Ghodpade family from Rajur donated her body to a medical college in Aurangabad. This selfless act provides invaluable resources for medical education, leaving a lasting legacy of knowledge.