औट्रम घाटातील बोगद्याच्या कामाला 'कात्रज'चा घाट; १० वर्षांत खर्च गेला २ हजारांवरून ५५०० कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2021 02:21 PM2021-09-01T14:21:21+5:302021-09-01T14:24:49+5:30

घाट व तेथील वाहतूक रामभरोसेच असून, मागील काही वर्षांपासून पावसाळ्यात दरड कोसळून वाहतूक ठप्प होण्याच्या घटना घडत आहेत.

Huge negligence for tunnel work in Autram Ghat near Kannad; Expenditure increased from Rs 2,000 to Rs 5,500 crore in 10 years | औट्रम घाटातील बोगद्याच्या कामाला 'कात्रज'चा घाट; १० वर्षांत खर्च गेला २ हजारांवरून ५५०० कोटींवर

औट्रम घाटातील बोगद्याच्या कामाला 'कात्रज'चा घाट; १० वर्षांत खर्च गेला २ हजारांवरून ५५०० कोटींवर

googlenewsNext
ठळक मुद्देडीपीआरचे काम अजून संपेनाकामाला लागणार सहा वर्षेपाच वर्षांत पाच वेळा दरड कोसळली

- विकास राऊत
औरंगाबाद : नॅशनल हायवे क्रमांक २११ वरील औरंगाबाद ते धुळे मार्गावर कन्नड व चाळीसगावच्या मधील औट्रम घाटातील बोगद्याचे काम १० वर्षांपासून रखडलेले आहे. २ हजार कोटींवरून ५५०० कोटींवर बोगद्याच्या कामाचा खर्च गेला असून आजवर प्रत्येक वेळी खर्चात कपात करण्याचा ‘घाट’ एनएचएआय मुख्यालयाने घातला आहे. बोगद्याचे काम जेव्हा सुरू होईल, तेथून पुढे सहा वर्षे कामाला लागणार आहेत.

२०११ मध्ये एनएच २११ या महामार्गाच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून धुळे ते औरंगाबाद ते येडशी हा मार्ग एनएचएआयकडे औट्रम घाटासह हस्तांतरित झाला. १० वर्षांत या घाटाचे स्ट्रक्चर ऑडिट किंवा सुरक्षा पाहणी झालेली नाही. त्यामुळे घाट व तेथील वाहतूक रामभरोसेच असून, मागील काही वर्षांपासून पावसाळ्यात दरड कोसळून वाहतूक ठप्प होण्याच्या घटना घडत आहेत.सुरुवातीला १५ पैकी ११.५ किमी., नंतर ७ किमी अंतरात बोगद्याचे काम करण्याचे ठरले. सुमारे साडेचार कि.मी. अंतराचे काम मृळ डीपीआरमधून कमी करून ५०० कोटींचा खर्चही कमी केला. आता पुन्हा खर्च कपातीचा घाट घालण्यात आला आहे. कामातील विलंबामुळे सुरुवातीला २ हजार, नंतर ३५०० कोटींवरून सध्या ५५०० कोटींवर बोगद्याच्या कामाचा खर्च गेला आहे.

१४ हजार मीटर डोंगर कधी फोडणार
मशीनच्या साहाय्याने १४ हजार मीटर डोंगर फोडावा लागणार आहे, काँक्रिटीकरण करणे, वरील भाग अर्धचंद्राकारात कापणे, बोगद्यातील इलेक्ट्रीसिटीचे काम करणे, व्हेंटिलेशन सुविधेसह हॉस्पिटल बांधण्याच्या कामांचा प्रस्तावात समावेश आहे. पूर्वीच्या डीपीआरमध्ये २३ हजार मीटर डोंगर कापून त्यातील दगड बाहेर काढणे प्रस्तावित होते. नंतर १४ हजार मीटर डोंगर कापावा लागेल, असे ठरले. आता पुन्हा डीपीआरचे काम सुरू केले आहे.

पाच वर्षांत पाच वेळा दरड कोसळली
कन्नडमार्गे चाळीसगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ११ कि.मी.चा औट्रमघाट वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. त्या घाटाला पर्यायी मार्ग नसल्यामुळे मागील काही वर्षांपासून रोज १२ हजारांहून अधिक वाहनांचा राबता तेथून होत आहे. २०१७ च्या पावसाळ्यात झालेल्या ७० मि.मी. पावसाच्या तडाख्याने घाटात साडेतीन मीटरपर्यंतचे भूस्खलन होऊन दरड कोसळली. २०१८, २०१९ आणि २०२० मध्येही कमी-अधिक प्रमाण दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. २०२१ मध्ये तर साडेपाच मीटरहून अधिक भूस्खलन झाले. कन्नड तालुक्यातील सातपैकी तीन मंडळात १०० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस ३१ ऑगस्ट रोजी झाल्याने दरडी कोसळून वाहनांवर पडल्या.

प्रकल्प संचालकांची माहिती अशी
नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे (एनएचएआय) प्रकल्प संचालक अरविंद काळे यांंनी सांगितले, औट्रम डीपीआरचे काम सुरू आहे. ५५०० कोटींचा अंदाजित खर्च आहे. त्यात कपात करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. साधारणत: ३०० कोटी प्रति किमी.चा खर्च बोगद्याला लागणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी : घाट पाच दिवसांसाठी बंद
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी औट्रम घाटात भेट देत घाटातील तपासणी नाका खुला करण्याचे आदेश दिले. घाटातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पर्यायी बोगदा निर्माण करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे देणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, औट्रमघाट सुमारे पाच दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागणार आहे. नांदगावमार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे. मलबा मोठ्या प्रमाणात पडलेला आहे, असे प्रकल्प संचालक काळे यांनी सांगितले.

Web Title: Huge negligence for tunnel work in Autram Ghat near Kannad; Expenditure increased from Rs 2,000 to Rs 5,500 crore in 10 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.