पहिल्या श्रावणी सोमवारी श्री घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी, शिवभक्तांची वर्दळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 14:31 IST2025-07-28T14:30:43+5:302025-07-28T14:31:44+5:30
वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिरात भक्तांची मोठी गर्दी, सुरक्षेची तगडी व्यवस्था

पहिल्या श्रावणी सोमवारी श्री घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी, शिवभक्तांची वर्दळ
- सुनील घोडके
खुलताबाद: श्रावण महिन्यातील पहिल्या श्रावणी सोमवारी वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी झाली होती. वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिरात भाविकांच्या सोयीसाठी रविवारी रात्रीपासून दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले असल्याने रात्रीपासून दर्शनासाठी गर्दी सुरू झाली होती. पहाटे ३ पासून पायी येणारे पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी मोठी केली होती. बम बम भोले, ओम नम: शिवाय, हर हर महादेवाच्या जय घोष करत दर्शन घेत होते. मंदीरातील अभिषेक व महापुजा मंदीर प्रशासनाने बंद केल्याने भाविकांचे थेट दर्शन होत होते. मंदीर परिसरात भाविकांना फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांच्या सोयीसाठी जादा एस टी बसेस, सिटी बसेस सोडण्यात आल्या असून कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पहाटे दर्शनावरून किरकोळ वाद
बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, पहाटेच्या वेळी दर्शनासाठी थेट प्रवेश देण्यावरून स्थानिक भाविक आणि सुरक्षा रक्षकामध्ये वाद होऊन त्याचे पर्यवसान मारहाणीत झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
नेमका वाद का आणि कसा झाला?
श्रावण महिन्यात दर सोमवारी पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळेत पंचक्रोशीतील स्थानिक नागरिक आणि महिनाभर पायी वारी करणाऱ्या भक्तांना थेट दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जातो. याच प्रथेनुसार, खुलताबाद येथून पायी आलेल्या काही तरुण भाविकांनी थेट प्रवेशाची मागणी केली. मात्र, सुरक्षा रक्षकाने त्यांना रांगेतून येण्यास सांगितल्याने वादाला सुरुवात झाली.
सामंजस्याने या प्रकरणावर पडदा टाकला
सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली, पण काही वेळातच रूपांतर धक्काबुक्की आणि मारहाणीत झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून उपस्थित इतर भाविक आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ मध्यस्थी केली आणि वाद मिटवला. यानंतर मंदिर विश्वस्त मंडळ आणि संबंधित भाविकांनी सामंजस्याने या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला.