मुख्य जलवाहिनीवर रस्ता तयार केलाच कसा? नॅशनल हायवेकडून महापालिकेने मागविला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 12:48 IST2024-12-19T12:47:03+5:302024-12-19T12:48:14+5:30
चूक कुणाची? शिक्षा कुणाला? ‘लोकमत’ने मागील दोन दिवसांपासून या धक्कादायक प्रकाराचा पाठपुरावा सुरू केला. त्यामुळे नॅशनल हायवे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोन विभागांत एकच खळबळ उडाली आहे.

मुख्य जलवाहिनीवर रस्ता तयार केलाच कसा? नॅशनल हायवेकडून महापालिकेने मागविला खुलासा
छत्रपती संभाजीनगर : शहरातील १८ लाखांहून अधिक नागरिक नवीन पाणीपुरवठा योजनेतून पाणी कधी येईल, याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. मार्च २०२५ पर्यंत पाणी येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आता ही आशा धूसर होताना दिसून येतेय. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत टाकण्यात आलेल्या मुख्य जलवाहिनीवर तब्बल १२ ते १४ किमी डांबरी रस्ता तयार करण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाने जलवाहिनीवर रस्ता तयार केलाच कसा? याचा खुलासा नॅशनल हायवेकडून मागविला आहे.
जायकवाडी ते नक्षत्रवाडीचे अंतर ३९ किमी आहे. आतापर्यंत ३४ किमी जलवाहिनी टाकण्यात आली. उर्वरित ४ किमी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला नॅशनल हायवेने जलवाहिनी नेमकी किती मीटर अंतरात आणि कुठे टाकायची हे सुद्धा निश्चित करून दिले होते. त्यानुसार २०२२ ते २०२४ पर्यंत ३४ किमी जलवाहिनी टाकली. २५०० मिमी व्यासाची ही जलवाहिनी असून, ४ हजार अश्वशक्तीचा पंप २४ तास चालणार आहे. जलवाहिनी फुटली, तर पाण्याचा दाब एवढा राहील की, एखादे चारचाकी वाहन किमान दीडशे फूट उंच उडेल.
‘लोकमत’ने मागील दोन दिवसांपासून या धक्कादायक प्रकाराचा पाठपुरावा सुरू केला. त्यामुळे नॅशनल हायवे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोन विभागांत एकच खळबळ उडाली आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेचा निधी शासनाकडून मनपाला येतो. हा निधी मनपा मजीप्राकडे वर्ग करते. त्याचप्रमाणे भविष्यात हा प्रकल्प मनपाकडे हस्तांतरीत होणार आहे. त्यामुळे योजनेवर मनपाचे लक्ष आहे. जलवाहिनीवर रस्ता केल्याच्या मुद्द्यावर मनपातील सूत्रांनी सांगितले की, अंतर्गत बैठकांमध्ये आम्ही नॅशनल हायवेकडे विचारणा केली आहे. भविष्यात तुम्ही जलवाहिनीवरून वाहने नेणार का, असा प्रश्न केला असून, त्यांचे उत्तर येणे बाकी आहे.
नॅशनल हायवे एवढेच मजीप्राही दोषी
मनपातील सूत्रांनी सांगितले की, नॅशनल हायवेने जलवाहिनीवर रस्ता तयार करायलाच नको होता. हा रस्ता तयार होत असताना, मजीप्राचे अधिकारी झोपले होते का? त्यांनी काम का थांबविले नाही. जलवाहिनीवर आठ ठिकाणी एअर व्हॉल्व्ह येणार, हे त्यांना माहीत नव्हते का?