पालकांनी कसे वागावे? अभ्यासावरून वडील रागावल्याने १२ वर्षाच्या मुलीने संपवले जीवन
By सुमित डोळे | Updated: October 18, 2023 12:06 IST2023-10-18T12:05:51+5:302023-10-18T12:06:28+5:30
पालक सभेत अभ्यासाविषयी विचारणा होईल, असे सांगून वडील तिला अभ्यासावरून रागावले

पालकांनी कसे वागावे? अभ्यासावरून वडील रागावल्याने १२ वर्षाच्या मुलीने संपवले जीवन
छत्रपती संभाजीनगर : येत्या शनिवारी शाळेत होणाऱ्या पालक सभा (पॅरेंट्स मीटिंग्स) च्या अनुषंगाने वडील अभ्यासावरुन रागावल्याने अवघ्या १२ वर्षाच्या प्रणवी अनिल उलेमाले हिने आयुष्य संपवले. मंगळवारी सायंकाळी आई, वडील कामावर असताना तिने घरात गळफास घेतला.
टिळक पथवरील नजर गल्लीत प्रणवी आई वडील, लहान भावासोबत राहत होती. जवळच तिचे आजोबा वास्तव्यास असतात. एका इंग्रजी शाळेत सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या प्रणवीने दुपारी आईसोबत जेवण केले. आई कामावर गेल्यानंतर आजोबांना देखील जेवणाचे ताट नेऊन दिले. त्यानंतर ती व तिचा लहान भाऊ दोघेच घरी होते. साधारण साडेपाच वाजता वडील घरी आल्यानंतर प्रणवी आतील खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. वडील अनिल उलेमाले व करण ठाकूर यांनी तिला फासावरून उतरवून घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झालेला होता.
पालक सभेत अभ्यासाविषयी विचारणा होईल, असे सांगून वडील तिला अभ्यासावरून बोलले. त्या रागातूनच तिने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. घटना कळताच क्रांती चौकचे निरीक्षक संतोष पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु प्रणवीने आत्महत्येपूर्वी कुठलाही मजकूर लिहिलेला आढळला नाही. आत्महत्येचे नेमके कारण तपासत असल्याचे पोलिसांनी सांगितले.