छत्रपती संभाजीनगरातील रुग्णालये, गेम झोन किती सुरक्षित? दरवर्षी आगीच्या ४५० ते ५०० घटना
By मुजीब देवणीकर | Updated: May 30, 2024 19:58 IST2024-05-30T19:58:13+5:302024-05-30T19:58:39+5:30
महापालिकेच्या अग्निशमन विभागाला प्रमुख अग्निशमन अधिकारी पाच वर्षांपासून मिळत नाही.

छत्रपती संभाजीनगरातील रुग्णालये, गेम झोन किती सुरक्षित? दरवर्षी आगीच्या ४५० ते ५०० घटना
छत्रपती संभाजीनगर : दिल्लीत बाल रुग्णालयाला आग लागल्याने ७ नवजात बालकांचा रविवारी मृत्यू झाला. शनिवारी गुजरातच्या राजकोटमध्ये एका गेमिंग झोनला आग लागल्याने २७ जणांचा कोळसा झाला. आगीच्या या घटना सर्वसामान्यांना सुन्न करणाऱ्या आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील रुग्णालये, गेमिंग झोन किती सुरक्षित आहेत? महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून नियमित तपासणीही केली जात नसल्याची धक्कादायक माहिती आहे. महत्त्वाची बाब म्हणजे १८ लाख लोकसंख्येच्या शहरातील अग्निशमन विभागाला कायमस्वरूपी आणि जबाबदार प्रमुखही नाही.
शहरात दरवर्षी ४५० ते ५०० ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडतात. यातील सर्वाधिक घटना घर, दुकाने, गोडाऊन, इलेक्ट्रिक डीपी आणि वाहनांना असतात. २०२३-२४ मध्ये मनपाच्या अग्निशमन विभागाकडे ४४९ कॉल आले. त्यातील एक कॉल रुग्णालयाचाही होता. शहरातील व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये अग्निरोधक यंत्रणा बसविली आहे किंवा नाही? बसविली असेल तर त्याची नियमित चाचणी घेतली जाते का? आग लागल्याची एखादी घटना घडली तर संबंधित उपकरणे काम करतात का? याची तपासणी करण्याची जबाबदारी महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे आहे. महापालिका कधीच अशा पद्धतीची तपासणी करीत नाही. खासगी एजन्सीधारकांनी आणून दिलेले तपासणी प्रमाणपत्र ग्राह्य धरून संबंधित प्रतिष्ठानाची नोंदणी केली जाते.
शहरातील रुग्णालये किती सुरक्षित आहेत, आग लागली तर रुग्ण नातेवाइकांना पर्यायी रस्ते आहेत का? विविध मॉलसह अनेक ठिकाणी गेमिंग झोन आहेत. त्यांची तपासणी मनपाकडून होत नाही. शहरातही गुजरात आणि दिल्लीसारखी घटना महापालिकेला अपेक्षित आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येतोय.
पूर्णवेळ अधिकारी नाही
महापालिकेच्या अग्निशमन विभागाला प्रमुख अग्निशमन अधिकारी पाच वर्षांपासून मिळत नाही. सेवानिवृत्त अधिकाऱ्यालाच वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. ६५ वर्षांनंतर निवृत्त अधिकाऱ्यांना कंत्राटी पद्धतीवरही घेता येत नाही. हा शासनाचाच नियम आहे. त्यानंतरही एकाच निवृत्त अधिकाऱ्याला ६५ वर्षे उलटल्यानंतरही मुदतवाढ देण्याच्या हालचाली मनपातील काही अधिकाऱ्यांकडून सुरू आहेत.
आता तपासणी होणार
शहरातील सर्व खासगी रुग्णालये, महापालिकेचे आरोग्य केंद्र, रुग्णालये आणि गेमिंग झोनची तपासणी करण्याचे निर्देश आजच देण्यात आले आहेत. मनपा रुग्णालयांपासून आम्ही सुरुवात करतोय. जिथे आग रोखण्यासाठी यंत्रणा नाही, तेथे अगोदर बसवण्यात येईल. त्यानंतर खासगी रुग्णालयांची तपासणी हाेईल.
- अंकुश पांढरे, उपायुक्त, मनपा.