उद्योगपती लड्डा यांच्या घरावरील दरोड्यात सोने खरेच गेले किती? आता पाेलिसही संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 19:53 IST2025-06-03T19:52:14+5:302025-06-03T19:53:45+5:30

मुदत उलटूनही लड्डांकडून दागिन्यांच्या पावत्या सादर नाहीच, २ जूनपर्यंत पोलिसांनी दिली होती वेळ

How much gold was actually stolen in the robbery at industrialist Ladda's house? Now even the police are confused | उद्योगपती लड्डा यांच्या घरावरील दरोड्यात सोने खरेच गेले किती? आता पाेलिसही संभ्रमात

उद्योगपती लड्डा यांच्या घरावरील दरोड्यात सोने खरेच गेले किती? आता पाेलिसही संभ्रमात

छत्रपती संभाजीनगर : बजाजनगरमधील संतोष लड्डा यांच्या घरावर पडलेल्या दरोड्यात नेमके किती सोने, चांदी लुटले गेले, याविषयी पोलिसही संभ्रमात आहेत. अटकेतील १२ आरोपींची कसून चौकशी सुरू असूनही अपेक्षित ५.५ किलो सोने व ३२ किलो चांदीची माहितीच पोलिसांना मिळालेली नाही. आता एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरच्या जवळील व्यक्तींच्या चौकशीवरच दागिन्यांच्या जप्तीची दिशा अवलंबून असल्याचे पोलिसांनी सांगितले.

३१ मे रोजी गुन्हे शाखेने या प्रकरणाचा मोठा उलगडा केला. सलग १५ दिवस चाललेल्या या तपासात १२ आरोपी पकडण्यात आले. ३३ तोळे सोने जप्त करण्यात आले. एन्काउंटर झालेल्या अमोलच्या कारमधून ४ तोळे सोने जप्त करण्यात आले. मात्र, गेल्या १३ दिवसांपासून आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना किमान ५० तोळे सोने देखील पोलिसांच्या हाती लागलेले नाही. त्यामुळे सोने, चांदी नेमके गेले किती, या संभ्रमात पोलिस आहेत.

तपासावरच प्रश्चचिन्ह
सोन्याचा व्यवहार केलेल्यांपैकी आणखी दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. रविवारी सुरेश ऊर्फ सूर्यकांत रामकिसन गंगणे (रा. अंबाजोगाई) याच्या पत्नी व सासऱ्याला अटक करण्यात आली. सोने विकून त्यांना मिळालेले ८ लाख रुपये जप्त केल्याचा दावा पोलिसांनी केला. मात्र, गंगणेने सोने किती ग्रॅम विकले, कोणत्या सराफाला विकले, याचा उलगडाच न केल्याने तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दागिन्यांच्या शोधाबाबत पथके पुन्हा जिल्ह्याबाहेर जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

आतापर्यंत पकडलेले आरोपी
याेगेश सुभाष हाजबे, सय्यद अजहरोद्दीन सय्यद कबिरोद्दीन, महेंद्र माधव बिडवे, देवीदास नाना शिंदे, बालासाहेब चंद्रकांत इंगोले, महेश दादाराव गोराडे, गणेश गंगाधर गोराडे, आजिनाथ पुंजाराम जाधव (सर्व रा. वाळूज महानगर परिसर), सुरेश ऊर्फ सूर्यकांत रामकिसन गंगणे, त्याची पत्नी बबिता, सासरा भारत कांबळे, सोहेल जलील शेख (सर्व रा. अंबाजोगाई).

२ जूनपर्यंत मागितला होता वेळ
लड्डा यांनी २ जूनपर्यंत दागिन्यांच्या पावत्या सादर करण्यासाठी वेळ मागितली होती. मात्र, मुदत उलटूनही त्यांनी एकही पावती सादर केली नाही. सामान्यांबाबत पावतीशिवाय गुन्हा दाखल न करणारे पोलिस लड्डा यांच्याबाबत मात्र सौजन्याची भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: How much gold was actually stolen in the robbery at industrialist Ladda's house? Now even the police are confused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.