‘फिटनेस’विना मनपाचे टँकर रस्त्यावर कसे? दरवर्षी निष्पाप नागरिकांच्या मृत्यूची मालिका

By मुजीब देवणीकर | Published: March 20, 2024 07:22 PM2024-03-20T19:22:03+5:302024-03-20T19:22:14+5:30

महापालिकेकडे असलेले बहुतांश टँकर नियमानुसार नाहीत.

How is the municipal tanker on the road without 'fitness'? A series of innocent civilian deaths every summer | ‘फिटनेस’विना मनपाचे टँकर रस्त्यावर कसे? दरवर्षी निष्पाप नागरिकांच्या मृत्यूची मालिका

‘फिटनेस’विना मनपाचे टँकर रस्त्यावर कसे? दरवर्षी निष्पाप नागरिकांच्या मृत्यूची मालिका

छत्रपती संभाजीनगर : शहरात २०० पेक्षा अधिक वसाहतींमध्ये जलवाहिन्या नाहीत. त्या वसाहतींची तहान भागविण्यासाठी मनपाने खासगी कंत्राटदारांचे टँकर नियुक्त केले आहेत. या टँकर्स चालकांकडे आरटीओ प्रमाणिक कोणतेही कागदपत्रे नाहीत. दररोज शहरातील मुख्य, अंतर्गंत रस्त्यांवर टँकर्स धावत आहेत. शनिवारी शेख कन्स्ट्रक्शनच्या टँकरमुळे आंबेडकरनगरजवळ एका निष्पाप तरुणाचा मृत्यू झाला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे टँकर्सचे 

फिटनेस प्रमाणपत्र नसतानाही मनपाचे टँकर्स रस्त्यावर कसे धावतात...?
महापालिकेतील खासगी टँकर्स, त्याची निविदा प्रक्रिया हा नेहमीच वादाचा भोवरा ठरत आला. काही वर्षांपूर्वी शहरातील संपूर्ण टँकर्सचा ठेका राम इन्फ्रास्ट्रक्चरला देण्यात आला. अडीच वर्षांहून अधिक कालावधी उलटल्यावर महापालिकेने अर्धे काम शेख कन्स्ट्रक्शनकडे सोपविले. कामाचा हा वाद अलीकडेच खंडपीठात पोहोचला होता. खंडपीठाने मनपाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. सध्या गुंठेवारी भागातील नागरिकांची तहान दोन्ही कंत्राटदार भागवत आहेत. शनिवारी दुपारी शेख कन्स्ट्रक्शनचा टँकर मिसारवाडीकडे जात असताना अचानक प्रशांत गंगावणे या तरुणाच्या अंगावर गेल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर महापालिकेच्या खासगी टँकरचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

कागदपत्रांचा अभाव
महापालिकेकडे असलेले बहुतांश टँकर नियमानुसार नाहीत. ट्रॅक्टरचे रूपांतर टँकरमध्ये केले. ४०७ मॅटडोरचे रूपांतर टँकरमध्ये केले. याला आरटीओची मान्यता नाही. वर्षानुवर्षे हे टँकर नागरिकांसाठी काळ बनून शहरातील रस्त्यांवर धावत आहेत. एकाही टँकरचे फिटनेस नाही.

दरवर्षी एक ते दोन जणांचा मृत्यू
मागील वर्षी बाबा पेट्रोल पंप येथे एका तरुणीचा मृत्यू झाला होता. यंदाच्या उन्हाळ्यात टँकरने प्रशांत गंगावणेचा बळी घेतला. हे सत्र केव्हापर्यंत चालेल ? हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. महापालिका यावर ठोस पाऊल उचलत नाही. आरटीओ कार्यालयही या गंभीर प्रश्नाकडे डोळेझाक करीत आहे.

काय म्हणाले अधिकारी 
शनिवारची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अपघातग्रस्त टँकरची कागदपत्रे आहेत. संबंधित पोलिस ठाण्याला ती सादर केली जातील. चालकाकडे लायसन्सही आहे. न्यायालयात प्रकरण चालेल. अपघातविरहित टँकर चालावेत यादृष्टीने सूचना देण्यात येतील, असे कार्यकारी अभियंता के. एम. फालक यांनी सांगितले. टँकर्सला कागदपत्रे नाहीत, या मुद्द्यावर त्यांनी मौन बाळगले.

Web Title: How is the municipal tanker on the road without 'fitness'? A series of innocent civilian deaths every summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.