शाळाच नसेल तर आम्ही IAS कसे होणार? विद्यार्थ्यांच्या प्रश्नानंतर मिटमिटा शाळेला २४ तासांत जागा प्राप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 20:08 IST2025-08-04T20:08:09+5:302025-08-04T20:08:30+5:30

अवघ्या २४ तासांत महापालिकेच्या शाळेला एक एकर जागा मिळाली. जागेचा मोबदला म्हणून महापालिका त्यांना टीडीआरसुद्धा देणार आहे.

How can we become IAS if there is no school? After students' questions, Municipal Corporation's Mitmita School gets one acre of land within 24 hours | शाळाच नसेल तर आम्ही IAS कसे होणार? विद्यार्थ्यांच्या प्रश्नानंतर मिटमिटा शाळेला २४ तासांत जागा प्राप्त

शाळाच नसेल तर आम्ही IAS कसे होणार? विद्यार्थ्यांच्या प्रश्नानंतर मिटमिटा शाळेला २४ तासांत जागा प्राप्त

छत्रपती संभाजीनगर : रस्ता रुंदीकरणात आमची शाळा पाडण्यात येणार आहे... शाळाच नसेल तर भविष्यात आम्ही आयुक्त कसे होणार? असा निरागस प्रश्न शनिवारी मिटमिटा शाळेतील विद्यार्थ्यांनी मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांना केला. प्रश्न प्रशासकांना अंतर्मुख करणारा होता. शाळेच्या शेजारी बांधकाम व्यावसायिक जुगलकिशोर तापडिया यांची खासगी जागा असल्याचे समजताच प्रशासक थेट त्यांच्या घरी गेले. त्यांना विनंती केली. क्षणार्धात तापडिया यांनी एक एकर जागा देण्याचा निर्णय घेतला. सोमवारी मनपा जागेचा ताबा घेऊन शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन करणार आहे.

महापालिकेच्या प्रत्येक शाळेचे विद्यार्थी दर शनिवारी प्रशासकांच्या ‘जलश्री’ बंगल्यावर येतात. दिवसभर विविध खेळ खेळतात. जी. श्रीकांत यांच्यासोबत संवाद साधतात. मिटमिटा शाळेच्या विद्यार्थ्यांनीही संवाद साधला. रस्ता रुंदीकरणात आपली शाळा जात असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. पर्यायी जागेसाठी जी. श्रीकांत तापडिया यांच्या निवासस्थानी गेले. त्यांना शेजारील जागा देण्याची विनंती केली. त्यांनी ‘मीसुद्धा गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शाळाच सुरू करणार होतो. तुमचा-माझा हेतू एकच आहे. जागा घेऊन टाका,’ असे सांगितले. तापडिया यांनी प्रशासकांना यशस्वी होण्याचा मार्ग असलेले एक पुस्तक भेट दिले. त्यात ‘ऑफर व्हॅलिड टुडे’ असा एक निकष होता. जी. श्रीकांत यांनी हा धागा पकडत त्यांना जागा देण्यासंदर्भातील सुंदर पत्र दिले. तापडिया यांनीही लगेच जागेचा ताबा घ्यावा, असे पत्र देऊन टाकले. अवघ्या २४ तासांत महापालिकेच्या शाळेला एक एकर जागा मिळाली. जागेचा मोबदला म्हणून महापालिका त्यांना टीडीआरसुद्धा देणार आहे. सोमवारी जागेचा ताबा घेऊन महापालिका भूमिपूजनही करणार असल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले.

दरवर्षी गुणवंत विद्यार्थी
मिटमिटा येथील शाळेचा निकाल खूप चांगला आहे. दरवर्षी दहावीतील विद्यार्थी किमान ९० टक्क्यांवर गुण घेतात. ५५२ विद्यार्थी शाळेत आहेत. सर्वसामान्य, मध्यमवर्गीय नागरिकांची मुले-मुली शाळेत शिक्षण घेतात. त्यांच्यासाठी जागा मिळाली. लवकरच टुमदार इमारत, क्रीडांगणही होईल; याचा आनंद असल्याचे जी. श्रीकांत यांनी ‘लाेकमत’ला सांगितले.

Web Title: How can we become IAS if there is no school? After students' questions, Municipal Corporation's Mitmita School gets one acre of land within 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.