करमाड हादरले! पेट्रोल पंपावर काम करताना महिलेची गळा चिरून हत्या; नवऱ्याचेच क्रूर कृत्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 14:21 IST2026-04-09T14:19:45+5:302026-04-09T14:21:48+5:30
पेट्रोल पंपावर नवऱ्यानेच चाकूने गळा चिरून केला पत्नीचा खून; करमाडमध्ये भरदिवसा थरार.

करमाड हादरले! पेट्रोल पंपावर काम करताना महिलेची गळा चिरून हत्या; नवऱ्याचेच क्रूर कृत्य!
करमाड (जि. छत्रपती संभाजीनगर): करमाड येथील गणपती मंदिराशेजारी असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर गुरुवारी (९ एप्रिल) दुपारी साडेबाराच्या सुमारास एक भयानक घटना घडली. आपल्या कामात व्यस्त असलेल्या पूजा सुदाम गावंडे (वय २७, रा. चितेपिंपळगाव, ह.मु. कुंभेफळ) या महिलेचा तिच्या पतीने सत्यम रावसाहेब गावंडे (रा. चितेपिंपळगाव) यानेच चाकूने गळा चिरून निर्घृण खून केला. या हल्ल्यात पूजा यांचा जागीच मृत्यू झाला असून, घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
भरदिवसा पंपावर रक्ताचा सडा
मिळालेल्या माहितीनुसार, पूजा गावंडे यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्यांनी सत्यम गावंडे सोबत दुसरे लग्न केले. दरम्यान, आज पूजा गावंडे या नेहमीप्रमाणे पेट्रोल पंपावर आपले कर्तव्य बजावत होत्या. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आरोपी सत्यम गावंडे तिथे पोहोचला. दोघांमध्ये काही काळ वाद झाला आणि संतापाच्या भरात सत्यमने जवळ असलेला तीक्ष्ण चाकू काढून पूजा यांच्या गळ्यावर वार केले. गळा चिरल्या गेल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन पूजा यांचा जागीच प्राण गेला. भरदिवसा आणि वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित नागरिक आणि कर्मचारी भयभीत झाले.
करमाडमध्ये पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलेचा पतीनेच चाकूने गळा चिरून केला खून; भरदिवसा थरार. #chhatrapatisambhajinagar#marathwadapic.twitter.com/RT1sTKk0fb
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) April 9, 2026
पोलिसांकडून अवघ्या काही तासांत आरोपी अटकेत
घटनेची माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप चौरे, जमादार शिवाजी मादेवाड, विनोद खिल्लारे यांच्यासह पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून हा खून झाल्याचा संशय असून, पोलिसांनी आरोपी सत्यम गावंडेचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली. अवघ्या काही तासांत कचनेर परिसरातून आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. भरवस्तीत आणि सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या खुनामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.