शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा; पीककर्ज भरण्यास अत्यल्प प्रतिसाद, बँकांमध्ये तुरळक गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 17:25 IST2025-03-26T17:21:20+5:302025-03-26T17:25:02+5:30

एप्रिल महिन्यापासून मिळते नवीन कर्ज

Hope of loan waiver; Farmers turn to paying crop loans; Rare crowd in banks | शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा; पीककर्ज भरण्यास अत्यल्प प्रतिसाद, बँकांमध्ये तुरळक गर्दी

शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा; पीककर्ज भरण्यास अत्यल्प प्रतिसाद, बँकांमध्ये तुरळक गर्दी

- जयेश निरपळ
गंगापूर :
मार्च महिना संपण्यास केवळ ६ दिवसांचा कालावधी शिल्लक असताना देखील पीक कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शाखांमध्ये कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची तुरळक गर्दी दिसत आहे.

शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमार्फत कर्ज वितरण केले जाते. यात सर्वाधिक कर्ज वितरण जिल्हा सहकारी बँकेमार्फत होते. फेब्रुवारी महिन्यापासून शेतकरी कर्ज भरत असतात. मात्र, सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असे आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी युती सरकारने दिले होते. त्यामुळे पुन्हा सत्तेत आलेले युती सरकार कर्जमाफी करेल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कर्ज भरण्यास आखडता हात घेतल्याने २४ मार्चपर्यंत औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची केवळ ८.६४ टक्के कर्ज वसुली झाली आहे.

३१ मार्चपर्यंत भरले तरच होणार व्याज माफ
शासनाकडून शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज दिले जाते. मात्र त्यासाठी अट म्हणजे संबंधित शेतकऱ्याने कर्जाची परतफेड ३१ मार्चपूर्वी करणे आवश्यक आहे. जवळपास ९ महिने कर्ज वापरता येत असल्याने बहुतांश शेतकरी ३१ मार्चपूर्वी कर्जाची परतफेड करतात. शेवटच्या आठ दिवसांमध्ये सर्वाधिक कर्जाची परतफेड होते.

बचत गटाच्या तुलनेत फायदेशीर
एप्रिलमध्ये उचललेले कर्ज थेट मार्च महिन्यात भरले जाते. जवळपास १० ते ११ महिने शेतकरी बिनव्याजी पैसे वापरू शकतात. त्यामुळे अनेक शेतकरी पीककर्जाची उचल करून नियमितपणे भरणा करतात. बचत गटाच्या तुलनेत पीककर्ज शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे.

सर्वाधिक कर्ज वितरण सहकारी बँकेमार्फत
सेवा सहकारी संस्थांमार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांशी जोडली आहे. तसेच ग्रामीण भागातील बहुतांश ग्रामस्थांचे बँक खाते सहकारी बँकांच्या शाखेत आहे. त्यामुळे सर्वाधिक शेतकरी सहकारी बँकेतूनच कर्जाची उचल करतात. जिल्हा बँकेने खरिपात आपल्या ११९ शाखांमार्फत ८८ हजार २०६ शेतकऱ्यांना ४४४.२४ कोटीचे कर्ज वितरण केले आहे. ही टक्केवारी बँकांना दिलेल्या उद्दिष्टांपैकी सर्वाधिक ९७.६४ एवढी होती. तर रब्बीसाठी डिसेंबरअखेर १२१ शेतकऱ्यांना ६३ लाख रुपयांचे म्हणजे केवळ ०.२६ टक्के कर्ज वितरण केले होते.

कर्जमाफीच्या आशेने अत्यल्प प्रतिसाद
शून्य टक्के व्याज दराचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी पीक कर्जाचा भरणा करावा. एप्रिल महिन्यात पुन्हा नवीन खरीप हंगामाचे कर्ज वितरण केले जाते. कर्जमाफीच्या आशेने यंदा अत्यल्प प्रतिसाद मिळत असला तरी, जास्तीत जास्त कर्ज वसुली होईल, असा अंदाज आहे.
-किरण पा. डोणगावकर, उपाध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

जिल्हा बँकेची २४ मार्चअखेर कर्जवाटप व वसुली माहिती (रक्कम कोटीत)
तालुका            कर्ज वाटप कर्ज वसुली वसुली टक्केवारी
छ.संभाजीनगर १४.३० ९.६४             ७.७१
सिल्लोड ३६.०६ ३५.९९             १८.१३
सोयगाव ३.५७            ३.५७             ५.९७
खुलताबाद ४.५३ ३.६१             ५.२९
कन्नड २९.७७ ३०.५७             १३.८०
पैठण             २७.६१ १६.१७             ७.३९
गंगापूर १५.२८ ८.६९             ३.९३
वैजापूर २९.२६ १५.३४             ४.५७
फुलंब्री ७.५६ ९.२४             १०.५२
एकूण १६७.९४ १३२.८२            ८.६४.

Web Title: Hope of loan waiver; Farmers turn to paying crop loans; Rare crowd in banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.