'हनी ट्रॅप', व्हिडीओ व्हायरलची धमकी; टोळीने व्यावसायिकाकडून एक लाखाची खंडणी उकळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 18:29 IST2025-09-12T18:28:54+5:302025-09-12T18:29:12+5:30

चिकन व्यावसायिकावर 'हनी ट्रॅप', टोळीतील मुलीने कॉल करून भेटायला बोलावले, तिघांनी मारहाण करत पैसे लुटले

'Honey Trap', video threatens to go viral; Gang extorts Rs 1 lakh ransom from businessman | 'हनी ट्रॅप', व्हिडीओ व्हायरलची धमकी; टोळीने व्यावसायिकाकडून एक लाखाची खंडणी उकळली

'हनी ट्रॅप', व्हिडीओ व्हायरलची धमकी; टोळीने व्यावसायिकाकडून एक लाखाची खंडणी उकळली

छत्रपती संभाजीनगर : चिकन व्यावसायिकाला कॉल करून मैत्री करण्याचा बहाणा करत चारजणांच्या टोळीने हनी ट्रॅपमध्ये अडकवले. दुपारी मैत्रिणीच्या खोलीवर भेटण्यास बोलावून तिघांनी बेदम मारहाण करून मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. ते व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा पाच तासांत त्याच्याचकडून एक लाख रुपयांची खंडणीदेखील वसूल केल्याचा प्रकार समोर आला आहे. १० सप्टेंबर रोजी व्यावसायिकाने तक्रार दिल्यानंतर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात मौसीन, जोयासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

हुसेन कॉलनीतील ४८ वर्षीय चिकन व्यावसायिकाचे एन-४ परिसरात दुकानाचे काम सुरू आहे. २ सप्टेंबर रोजी दुपारी १:३० वाजता त्यांना अज्ञात क्रमांकावरून एका मुलीने कॉल केला. माझ्याशी मैत्री कर, असा हट्ट धरला. व्यावसायिकाने सुरुवातीला नकार दिला. मात्र, तिने वारंवार कॉल केले. दुसऱ्या क्रमांकावरून कॉल करत भेटण्यासाठी आग्रह धरला. ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता तिने व्यावसायिकाला दुपारी जवळपास तासभर फिरवून चार वाजता मैत्रिणीच्या कौसरपार्कच्या खोलीवर भेटण्यास बोलवले. व्यावसायिक तेथे पोहोचताच तेथे तीन तरुण उपस्थित होते. त्यांनी अचानक व्यावसायिकावर हल्ला चढवत 'तू माझ्या बहिणीला त्रास का देतोय, तुला संपवून टाकू' असे धमकावत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करून त्यांच्या खिशातील पाच हजार ३०० रुपये काढून घेत आणखी पाच लाखांच्या खंडणीची मागणी केली.

या घटनेमुळे व्यावसायिक घाबरून गेले. त्यांनी तत्काळ चिकलठाण्यातील मित्राला संपर्क केला. अडचणीत सापडल्याचे सांगून एक लाख रुपये देण्यास सांगितले. नारेगावच्या एका हॉटेलसमोर फरान नावाच्या मुलाने त्यांच्या मित्राकडून एक लाख रुपये उकळले. या हनी ट्रॅपमुळे घाबरून व्यावसायिकाची प्रकृती बिघडली. त्यातून सावरल्यानंतर त्यांनी १० सप्टेंबर रोजी एमआयडीसी सिडकोचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्याकडे तक्रार केली. घटनेची शहानिशा करत असून, तांत्रिक तपास सुरू असल्याचे पोलिस उपनिरीक्षक जगन्नाथ मेंदकुदळे यांनी सांगितले.

Web Title: 'Honey Trap', video threatens to go viral; Gang extorts Rs 1 lakh ransom from businessman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.