बीड जिल्ह्यातील सर्व बेपत्ता महिला आणि मुलांचा शोध घेण्यासाठी उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 15:15 IST2025-07-19T15:05:59+5:302025-07-19T15:15:01+5:30
पोलिसांच्या तपासावर तीव्र नाराजी; विशेष पथक नेमून तपास करण्याचे पोलिस अधीक्षकांना आदेश

बीड जिल्ह्यातील सर्व बेपत्ता महिला आणि मुलांचा शोध घेण्यासाठी उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल
छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील सर्व बेपत्ता महिला व मुलांचा शोध लागत नसल्याबाबत उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. संजय देशमुख यांनी पोलिसांच्या तपासावर तीव्र नाराजी व्यक्त करून बीडचे पोलिस अधीक्षक यांना ‘विशेष पथक’ नेमून याचिकाकर्त्यांसह सर्वच बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याचे ११ जुलै २०२५ रोजी आदेशित केले आहे.
बेपत्ता असलेल्या ओमकार सुधाकर कांबळे (१४ वर्षे) आणि एक महिला व तिच्या २ बालकांचा शोध घेण्याबाबत दाखल स्वतंत्र फौजदारी याचिकांच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात बेपत्ता महिला आणि मुलांचे प्रमाण जादा असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. तसेच वरीलप्रमाणे आदेश दिले आहेत. या याचिकेवर ८ ऑगस्ट २०२५ रोजी पुढील सुनावणी होणार आहे. ‘बेपत्ता मुले व महिलांचा शोध घेऊन त्यांना संरक्षण देणे. आवश्यकता असल्यास सुरक्षित स्थळी आसरा देणे’ हे पोलिसांचे मूलभूत कर्तव्य असल्याचे शहाजी जगताप विरुद्ध महाराष्ट्र राज्य या जनहित याचिकेतील आदेशात म्हटल्याचा संदर्भ देत खंडपीठाने बीड पोलिसांना नेमका ‘या कर्तव्याचा’च विसर पडल्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे.
काय आहे याचिका ?
बीड जिल्ह्यातील पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ढेकणमोह येथील ओमकार सुधाकर कांबळे (१४ वर्षे) हा बेपत्ता झाल्याबद्दल त्याच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. मात्र, पोलिस व्यवस्थित तपास करत नसल्यामुळे त्यांनी ॲड. महेंद्र गंडले यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याचिकेवरील सुनावणीदरम्यान तपास अधिकाऱ्यांनी ओमकारचा शोध घेतला, परंतु तो सापडला नाही, असा अहवाल खंडपीठात सादर केला. या अहवालावरून पोलिसांनी ओमकारचा शोध घेण्याचा अजिबात प्रयत्न केला नसल्याचे दिसते, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.
असे नेमावे पथक
पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, हेडकॉन्स्टेबल आणि काॅन्स्टेबल अशा विविध पदांच्या किमान ५ जणांचे विशेष पथक नेमून वरील २ याचिकेतील बेपत्ता व्यक्तींसह बीड जिल्ह्यातील सर्वच बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी हे पथक तज्ज्ञांचीही मदत घेऊ शकेल, असे स्पष्ट करून ‘अशा कामाबद्दल ज्यांना आस्था नाही, अशांकडे हे काम सोपवू इच्छित नसल्याचे’ म्हणत खंडपीठाने बीड पोलिसांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.