मशिनच्या दुरुस्तीसाठी शोधलेला हेल्पलाइन क्रमांक निघाला सायबर गुन्हेगारांचा, २.६४ लाख लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 18:13 IST2025-10-09T18:13:36+5:302025-10-09T18:13:58+5:30
माहिती भरण्यास सांगितले, मग ५ रुपये भरण्यास सांगून बँक खातेच रिकामे केले

मशिनच्या दुरुस्तीसाठी शोधलेला हेल्पलाइन क्रमांक निघाला सायबर गुन्हेगारांचा, २.६४ लाख लंपास
छत्रपती संभाजीनगर : खराब झालेल्या वॉशिंग मशिन दुरुस्तीसाठी कंपनीच्या सर्व्हिस सेंटरचा क्रमांक इंटरनेटवर शोधण्यासाठी गेलेल्या महिलेची सायबर गुन्हेगारांनी फसवणूक केली. सर्व्हिस सेंटरचा म्हणून मिळालेला क्रमांक सायबर गुन्हेगारांचा निघाला. त्यानंतर त्यांनी महिलेला दुरुस्तीसाठी फॉर्म भरण्याच्या नावाखाली लिंक पाठवून मोबाइल हॅक केला. त्यांच्या खात्यातून २ लाख ६४ हजार रुपये लंपास केले. मंगळवारी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
२८ वर्षीय गृहिणी सिडको परिसरात कुटुंबासह वास्तव्यास आहे. त्यांचे पती डॉक्टर आहेत. काही महिन्यांपासून त्यांची वॉशिंग मशिन खराब होती. १२ सप्टेंबर रोजी सॅमसंग सर्व्हिसिंग सेंटर नावाने हेल्पलाइन क्रमांक शोधण्याचा प्रयत्न केला. पहिल्या पर्यायातील क्रमांकावर त्यांनी संपर्क केला. कॉलवरील व्यक्तीने त्यांना तत्काळ दुसऱ्या क्रमांकावरून संपर्क साधला. फॉर्मची लिंक पाठवली. इंग्रजीमधून ‘रिपेअर सर्व्हिस’ नाव असलेली एपीके फाइल महिलेला व्हॉट्सॲपवर प्राप्त झाली. त्यात महिलेने नाव, पत्ता भरला. कॉलवरील व्यक्तीने त्यांना ५ रुपये पाठवण्यास सांगितले. महिलेने पैसे पाठवले. मात्र, ते गेले नाही, तेव्हा कॉलवरील व्यक्तीने दुरुस्तीसाठी आल्यावर पैसे द्या, असे सांगून संभाषण संपवले.
काही क्षणांत बँक खाते रिकामे झाले
दुपारी १२ वाजेपर्यंत महिलेने ही प्रक्रिया पार पाडलेली असताना, दुपारी १:३० वाजता त्यांच्या बँक खात्यातून २ वेळा २ रुपये अज्ञात बँक खात्यावर वळते झाले. त्यानंतर ३:३० वाजता ५ टप्प्यांत २ लाख ६३ हजार ७८८ रुपये लंपास झाले. आपली फसगत झाल्याचे कळताच महिलेने बँकेला संपर्क करून खाते गोठवले. त्यानंतर त्यांनी सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक अशोक भंडारे तपास करत आहेत.
महिलेसोबत नेमके काय झाले?
महिलेने गुगलवर शोधलेला सर्व्हिस सेंटरचा क्रमांक सायबर गुन्हेगारांचा होता. अशा सर्च इंजिनमध्ये मोठ्या, नामांकित कंपन्या, व्यक्तींच्या नावे माहिती टॉपवर ठेवण्यासाठी ही शक्कल वापरली जाते. सायबर गुन्हेगारांनी महिलेला एपीके फाइल पाठवली. ती इंस्टॉल करताच महिलेच्या मोबाइलचा संपूर्ण ताबा गुन्हेगारांना मिळाला.
मोबाइल हॅक कसा झाला?
गुन्हेगारांनी पाठवलेली एपीके फाइल अधिकृत ॲप नव्हते. ते इन्स्टॉल केल्याने मोबाइलचा गुन्हेगारांना रिमोट ॲक्सेस मिळतो. त्यामुळे गुन्हेगारांना महिला मोबाइलमध्ये करत असलेली प्रत्येक गोष्ट, टाइप करत असलेले प्रत्येक अक्षर दिसत होते. परिणामी, त्यांनी महिलेच्या बँक खात्याची माहिती व पासवर्ड देखील हेरला. त्यानंतर खाते रिकामे केले.
फसवणूक टाळण्यासाठी हे लक्षात ठेवा
-गुगल अथवा सर्च इंजिनवर मिळालेल्या क्रमांकावर विश्वास ठेवू नका.
-उत्पादनाच्या अधिकृत वेबसाइटवरूनच हेल्पलाइन क्रमांक, ई-मेलआयडीचा वापर करा.
-अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या लिंक्स किंवा फाइल्स डाउनलोड करू नका. कुठल्याही लिंकवर बँक किंवा वैयक्तिक माहिती देऊ नका.