मुसळधार पावसाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लघु, मध्यम प्रकल्प तुडुंब; नद्या-नाल्यांना पूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 16:55 IST2025-08-18T16:47:48+5:302025-08-18T16:55:01+5:30
या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या असून पिकेही भुईसपाट झाली.

मुसळधार पावसाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लघु, मध्यम प्रकल्प तुडुंब; नद्या-नाल्यांना पूर
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात विविध भागांत शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने इसम, सोना, केळना, वाघूर नद्यांना पूर आला असून सोयगावचा वेताळवाडी, पिशोर येथील अंजना-पळशी व फुलंब्री मध्यम प्रकल्प भरले. या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या असून पिकेही भुईसपाट झाली.
पिशोरजवळ असलेल्या भिलदरी शिवारातील इसम नदीला शुक्रवारी रात्री आलेल्या पुरामुळे या नदीवरील नळकांडी पूल वाहून गेला. गंगापूर तालुक्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे. कन्नड तालुक्यातील पिशोर येथील अंजना- पळशी मध्यम प्रकल्प रविवारी १०० टक्के भरला.सिल्लोड तालुक्यात शनिवारी अजिंठा, गोळेगाव, अंभई, आमठाणा या चार महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. विविध दुर्घटनांत तीन जनावरे दगावली. केळणा नदीला पूर येऊन केळगाव-आमठाणा मार्गावरील पूल पाण्याखाली गेला होता. पाच गावांचा संपर्क तुटला होता. भिलदरी शिवारात शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. यामुळे इसम नदीला पूर आल्याने या नदीवरील नळकांडी पूल वाहून गेला. यामुळे गोठवाळवाडी व सुनाळवाडी वस्तीचा संपर्क तुटला. फुलंब्री तालुक्यात फुलंब्री मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असून जमिनीतील पाण्याची पातळीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा खरीप पिकांसोबतच रबी हंगामातील पिकांनाही फायदा होणार आहे.
सोयगावात सलग ५ तास पाऊस; वेताळवाडी धरण ओव्हरफ्लो
सोयगाव तालुक्यात प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर शनिवारी रात्री तब्बल पाच तास जोरदार पाऊस झाल्याने वेताळवाडी धरण ओव्हरफ्लो झाले असून, सोना नदी दुथडी भरून वाहत होती. तालुक्यात चारही महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. वेताळवाडी धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे सोना नदीला मोठा पूर आला. सोयगाव शिवारात मका, कपाशी, पिके पाण्यात बुडाली आहेत. जरंडी परिसरात धिंगापूर धरणात पाण्याची आवक वाढली. सोयगाव-चाळीसगाव रस्त्यावरील घोसला गावाजवळील खटकाळी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत होते. रविवारी दुपारी पाणी कमी झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. अजिंठा लेणी परिसरात शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसानंतर रविवारी सकाळपासून लेणी परिसरातील सप्तकुंड धबधबा वाहू लागला आहे. फर्दापूर येथील वाघूर नदीला या वर्षातील पहिलाच मोठा पूर आला.