उष्णतेच्या लाटेचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:45 IST2019-05-21T23:45:12+5:302019-05-21T23:45:43+5:30

शहरात गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा पारा तापला आहे. उष्णतेच्या लाटेने औरंगाबादकर हैराण झाले आहेत. शहरात मंगळवारी (दि. २१) तापमानाचा पारा ४२.६ अंशांवर पोहोचला. तापमानाने गतवर्षीची उच्चांकी पातळी गाठली असून, वैशाख वणवा पेटल्याचा अनुभव शहरवासीयांना येत आहे.

Heat wave | उष्णतेच्या लाटेचा तडाखा

उष्णतेच्या लाटेचा तडाखा

ठळक मुद्देवैशाख वणवा पेटला : तापमानाचा पारा ४२.६, गाठली गतवर्षीची उच्चांकी पातळी

औरंगाबाद : शहरात गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा पारा तापला आहे. उष्णतेच्या लाटेने औरंगाबादकर हैराण झाले आहेत. शहरात मंगळवारी (दि. २१) तापमानाचा पारा ४२.६ अंशांवर पोहोचला. तापमानाने गतवर्षीची उच्चांकी पातळी गाठली असून, वैशाख वणवा पेटल्याचा अनुभव शहरवासीयांना येत आहे.
शहरात गेल्या आठवडाभरापासून सूर्य तळपत असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. तापमानाचा पारा आठवडाभर ४० अंशांवर राहिला. दोन दिवसांपासून तापमानाने पुन्हा एकदा उसळी घेतली असून, मंगळवारी कमाल तापमान ४२.६ अंशांवर गेले, तर किमान तापमान २८.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानातही मोठी वाढ झाली असून, उन्हाने अंगाची लाहीलाही होत असल्याचा अनुभव औरंगाबादकरांना येत आहे.
शहरात मंगळवारी दिवसभर उन्हाच्या तीव्र झळा जाणवत होत्या. वाढलेल्या तापमानाने दुपारी उन्हाचे चटके असह्य होत आहेत. त्यामुळे घराबाहेर पडण्याचे नागरिक टाळत होते. शहरातील अनेक रस्त्यांवर शुकशुकाट जाणवला. यंदा उन्हाळा चांगलाच तापदायक ठरल्याच्या भावनाही नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर वैशाख वणव्याचा तडाखा नागरिकांना जाणवू लागला आहे.
शहरात गतवर्षी सर्वाधिक तापमान २९ मे रोजी तापमान ४२.६ अंश नोंदविले गेले होते. यावर्षी २७ एप्रिल रोजी कमाल तापमानाने ४३.६ अंश सेल्सिअस असा मोसमातील उच्चांक गाठला होता. मात्र, मंगळवारी तापमानाने गतवर्षीची उच्चांकी पातळी गाठली. वाढत्या उकाड्याने अंगाची लाहीलाही होत आहे. घामाच्या धारांनी प्रत्येक जण त्रस्त होत आहे. आगामी आठवडाभर तापमानाचा पारा अधिक राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पारा जाणार ४३ अंशांवर
शहरात २२ ते २७ मेदरम्यान तापमानाचा पारा हा ४३ अंशांवर जाणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस तरी तीव्र उकाड्याला शहरवासीयांना सामोरे जावे लागणार असल्याचे दिसते.

Web Title: Heat wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.