'मे' अखेरीला वाढला उन्हाचा चटका; ढगाळ वातावरणात शहरवासीय उकाड्याने हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 19:23 IST2019-05-20T19:17:34+5:302019-05-20T19:23:00+5:30
गत महिन्यात २४ तारखेला कमाल तापमानाने ४३.६ अंश सेल्सिअस असा मोसमातील उच्चांक गाठला होता.

'मे' अखेरीला वाढला उन्हाचा चटका; ढगाळ वातावरणात शहरवासीय उकाड्याने हैराण
औरंगाबाद : शहरात मे महिन्याच्या अखेरीला उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. तापमानाचा पारा रविवारी (दि. १९) ४१ अंशांजवळ गेला. जून महिन्याच्या तोंडावर उकाडा वाढत असल्याने शहरवासीय चांगलेच घामाघूम होत आहेत.
चिकलठाणा वेधशाळेत रविवारी कमाल तापमान ४०.८ आणि किमान तापमान २६.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. गत महिन्यात २४ तारखेला कमाल तापमानाने ४३.६ अंश सेल्सिअस असा मोसमातील उच्चांक गाठला होता. २६ एप्रिल १९५८ रोजी इतकेच तापमान नोंदविले गेले होते. तब्बल ६१ वर्षांनंतर याच उच्चांकी तापमानाचा रेकॉर्ड झाला. त्यानंतर मात्र तापमानाचा पारा उतरला.
शहरात १ मे नंतर तापमान ३८ अंशांपर्यंत घसरले होते; परंतु आता गेल्या आठवडाभरापासून तापमानात पुन्हा एकदा वाढ झाली. सलग आठवडाभर तापमान ४० अंशांवरच राहिले. मे महिन्याच्या अखेरीला वाढत्या तापमानाबरोबर शहरात अधूनमधून ढगाळ वातावरण राहत आहे. मात्र, अशा वातावरणातही शहरात चांगलाच उकाडा जाणवत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर सूर्य आग ओकत असल्याचा अनुभव शहरवासीयांना येत आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेही अवघड होत आहे. वाढत्या उकाड्याने अंगाची लाहीलाही होत आहे. घामाच्या धारांनी प्रत्येक जण त्रस्त होत आहे.
४० अंशांवरच पारा
आगामी आठवडाभर तापमानाचा पारा हा ४० अंशांवरच राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी काही दिवस उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.