आरोग्याकडे होतोय तरुणांचा कानाडोळा !
By Admin | Updated: November 25, 2014 00:57 IST2014-11-25T00:39:30+5:302014-11-25T00:57:27+5:30
उस्मानाबाद : शहरातील २५ ते ४० या वयोगटातील सुमारे ३९ टक्के तरुणांना कोणत्या ना कोणत्या आजारांना सामोरे जावे लागते.

आरोग्याकडे होतोय तरुणांचा कानाडोळा !
उस्मानाबाद : शहरातील २५ ते ४० या वयोगटातील सुमारे ३९ टक्के तरुणांना कोणत्या ना कोणत्या आजारांना सामोरे जावे लागते. नियमित व्यायामाचा अभाव आणि आरोग्याकडेही दुर्लक्ष केल्याने ही तरुणाई आजाराच्या विळख्यात सापडत असल्याचे ‘लोकमत’ सर्वेक्षणातून पुढे येत आहे. विशेष म्हणजे मधुमेह आणि रक्तदाब या आजारांना चाळीशीच्या आतच सामोरे जावे लागत असल्याचेही हे सर्वेक्षण सांगते.
मागील काही वर्षात आहाराबरोबरच एकूणच जीवन पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. सर्वच क्षेत्रात चुरस वाढल्याने या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ही तरुणाई दिवसरात्र धडपडत असते. अशावेळी आरोग्याकडेही दुर्लक्ष होते. त्याचेच परिणाम चाळीशीच्या आतच भोगावे लागत असल्याचे या सर्वेक्षणावरुन स्पष्ट होत आहे. ‘आपणास कोणत्या आजाराला सामोरे जावे लागत आहे’ असा प्रश्न ‘लोकमत’ने प्रश्नावलीच्या माध्यमातून २५ ते ४० या वयोगटातील तरुणांना विचारला होता. ६१ टक्के तरुणांनी कोणताही मोठा आजार नसल्याचे सांगितले असले तरी सर्दी, पडसे, पाठदुखी सारखा त्रास कधी-कधी जाणवतो, असे यावेळी सांगितले. १८ टक्के तरुणांनी मधुमेहाचा आजार असल्याचे नमूद केले. तर १३ टक्के जणांनी रक्तदाब असल्याचे सांगत, इतर ८ टक्के तरुणांनीही इतर आजाराला सामोरे जावे लागत असल्याचे या सर्वेक्षणावेळी स्पष्ट केले.
ऐन तरुण वयात आजाराच्या विळख्यात ही तरुणाई सापडत असून, आरोग्याची योग्य काळजीही घेतली जात नसल्याचे यावेळी पुढे आले.आजार होवू नये आणि एखाद्या आजाराची लागण झाली ुअसेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करण्याची गरज आहे. मात्र अनेकजण याकडेही कानाडोळा करीत असल्याचे या सर्वेक्षणावेळी स्पष्ट झाले. सर्वेक्षण केलेल्यातील ५६ टक्के तरुणांनी मागील आरोग्य तपासणी नेमकी केंव्हा केली हे आठवत नसल्याचे सांगितले. २३ टक्के तरुणांनी आरोग्य तपासणी करुन सहा महिने झाले असतील असे सांगितले. १७ टक्के तरुणांनी तीन महिन्यापूर्वी डॉक्टरांकडे गेलो होतो असे नमूद केले. तर ४ टक्के तरुणांनी चालू महिन्यातच आरोग्य तपासणी केल्याचे सर्वेक्षणावेळी सांगितले.
आपल्या परिसरात उपलब्ध होणाऱ्या आरोग्य सेवेबाबतही ही तरुणाई काहीशी नाखूष असल्याचेच या सर्वेक्षणावेळी दिसून आले. ३६ टक्के तरुणांनी आरोग्य सेवेचा दर्जा चांगला असल्याचे म्हटले असले तरी ४३ टक्के तरुणांनी मात्र त्यांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळत नसल्याचेच एकप्रकारे नमूद केले आहे. तर २१ टक्के तरुणांनी आरोग्य सेवेच्या दर्जाबाबत काहीहीसांगता येत नसल्याचे म्हटले आहे. (जि.प्र.)
मागील काही वर्षात उस्मानाबाद शहरात आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न झाला आहे. खाजगी रुग्णालयाबरोबरच शासकीय रुग्णालयातही तज्ञ डॉक्टरांसह अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध आहे. मात्र तरीही जिल्ह्याबाहेरील शेजारच्या शहरात जावून उपचार करणाऱ्यांची संख्या तब्बल ७ टक्के असल्याचे या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. एखादा आजार उद्भवल्यास शहरातील खाजगी रुग्णालयाला प्राधान्य देणाऱ्या तरुणांची संख्या ५८ टक्के असल्याचे दिसून आले. तर ३५ टक्के तरुण शहरातील शासकीय रुग्णालयाला प्राधान्य देत असून, ७ टक्के तरुणांनी मात्र जिल्ह्याबाहेरील रुग्णालयात उपचारासाठी जात असल्याचे सांगितले.
चांगल्या आरोग्यासाठी नियमित व्यायाम करा असा सल्ला वडिलधाऱ्यांसह सर्वचजण तरुणांना देत असतात. अनेकजण भल्या पहाटे व्यायाम तसेच जॉगींगसाठी घराबाहेर पडत असले तरी तब्बल ४९ टक्के तरुणांचे व्यायामसह आहार आणि इतर बाबींकडेही दुर्लक्ष असल्याचे या सर्वेक्षणावेळी दिसून आले. २१ टक्के तरुणांनी आपण नियमित व्यायाम करतो असे सांगितले. तर १२ टक्के तरुणांनी आहाराच्या दर्जाबरोबरच जेवणाच्या वेळाही पाळतो असे नमूद केले. विशेष म्हणजे आपल्याला कसलेही व्यसन नाही असे सांगणाऱ्या तरुणांची संख्या अवघी १८ टक्के असल्याचे या सर्वेक्षणावेळी स्पष्ट झाले.